Ajit Pawar : 'विमान ढगात गेलं, आणि पोटात गोळा आला', अजितदादांनी सांगितली होती धडकी भरवणारी आठवण
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं आहे. सकाळी मुंबईहून बारामतीला जात असतानाच लॅन्डिंगच्या वेळी अजितदादांचं विमान कोसळलं.
महेश तिवारी, प्रतिनिधी
गडचिरोली : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं आहे. सकाळी मुंबईहून बारामतीला जात असतानाच लॅन्डिंगच्या वेळी अजितदादांचं विमान कोसळलं ज्यात विमानात असलेल्या सर्व 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अजितदादांच्या अकाली मृत्यूमुळे महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. याआधी गडचिरोली दौऱ्यावर असताना अजितदादांनी विमानाबद्दल आलेला धक्कादायक अनुभव सांगितला होता.
advertisement
काय म्हणाले होते अजितदादा?
विमान ढगात गेलं आणि माझ्या पोटात गोळा आला. अजित दादांनी गडचिरोलीतल्या दौऱ्या दरम्यान आलेला अनुभव भाषणात सांगितला होता. अजित दादांचा या वाक्याची आजच्या अपघाताने आठवण करून दिली.
17 जुलै 2024 रोजी पाऊस धो-धो कोसळत होता. नागपूरवरून गडचिरोलीला जाताना अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच हेलिकॉप्टरमध्ये होते. बाहेर दाट धुके आणि काळेकुट्ट ढग होते. हेलिकॉप्टर जेव्हा ढगांच्या गर्दीत शिरले, तेव्हा अजितदादांसारखा कणखर माणूसही क्षणभर डगमगला होता. गडचिरोलीच्या वडलापेठ येथील कार्यक्रमाच्या भाषणात स्वतःलाच चिमटा काढत ते म्हणाले होते, 'विमान ढगात गेलं आणि माझ्या पोटात गोळा आला, मी इकडे-तिकडे पाहत होतो, घाबरलो होतो. पण शेजारी बसलेले देवेंद्रजी एकदम निवांत गप्पा मारत होते', असं अजितदादा म्हणाले होते.
advertisement
अजितदादांनी त्या सभेत हसत-हसत सांगितले होते की, जेव्हा त्यांनी आपली भीती फडणवीसांजवळ व्यक्त केली, तेव्हा फडणवीस म्हणाले होते, दादा घाबरू नका, माझे आतापर्यंत सहा अपघात झालेत, पण मी विमानात असलो की काही होत नाही. फडणवीसांच्या त्या उत्तरावर तेव्हा गडचिरोलीत हशा पिकला होता आणि दादांनीही ही त्यांच्या पूर्वजांची पुण्याई आहे असे म्हणत तो विषय संपवला होता.
Location :
Baramati,Pune,Maharashtra
First Published :
Jan 28, 2026 2:14 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ajit Pawar : 'विमान ढगात गेलं, आणि पोटात गोळा आला', अजितदादांनी सांगितली होती धडकी भरवणारी आठवण








