कार आतून लॉक, बॅटरीही डाऊन, नर्तिकेच्या नादात जीव देणाऱ्या उपसरपंच प्रकरणाला वेगळं वळण, नातेवाईकाचा मोठा दावा
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
गेवराई तालुक्यातील लुखामसला येथील माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या संशयास्पद मृत्यूने एक नवे वळण घेतले आहे.
सोलापूर: गेवराई तालुक्यातील लुखामसला येथील माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या संशयास्पद मृत्यूने एक नवे वळण घेतले आहे. बर्गे यांनी आत्महत्या केली नसून, हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय त्यांच्या नातेवाईकाकडून व्यक्त केला जातोय. त्यामुळे पोलिसांपुढे तपास करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
कार आतून लॉक, बॅटरीही डिस्चार्ज
मिळालेल्या माहितीनुसार, नर्तिका पूजा गायकवाड हिच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकून गोविंद बर्गे यांनी आत्महत्या केल्याची फिर्याद त्यांच्या पत्नीच्या भावाने दिली होती. मात्र, घटनास्थळाची पाहणी केली असता अनेक संशयास्पद गोष्टी समोर आल्या. गोविंद बर्गे ज्या कारमध्ये मृतावस्थेत आढळले, तिचे दरवाजे आतून बंद (लॉक) होते. गाडीची बॅटरी डिस्चार्ज झालेली होती आणि गाडीतील डिझेलही संपलेले होते. या सर्व बाबी आत्महत्येपेक्षा घातपाताकडे अधिक लक्ष वेधतात, असा दावा गोविंदचे नातेवाईक शिवराज खराडे यांचा आहे.
advertisement
नातेवाईकांनी समाज माध्यमातून व्यक्त केलेल्या संशयामुळे आता पोलीस या प्रकरणाकडे अधिक गांभीर्याने पाहत आहेत. राजकारणात उपसरपंच म्हणून काम केलेले गोविंद बर्गे भूखंड आणि जमीन विक्रीच्या व्यवसायातही सक्रिय होते. सासुरे गावात पूजाच्या घरासमोरच त्यांच्या गाडीत मृतदेह आढळल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
त्यामुळे पोलिसांना आता अनेक शक्यतांचा तपास करणे गरजेचे आहे. गोविंद बर्गे सासुरे येथे कधी आले? त्यांच्यासोबत गाडीत अन्य कोणी होते का? पूजा त्यावेळी सासुरे येथे उपस्थित होती का? गोविंद यांच्या व्हॉट्सअॅपवर कोणासोबत काय संभाषण झाले? गोविंदच्या बँक खात्यातून झालेले व्यवहार, ते ब्लॅकमेलिंगचे बळी ठरले होते का, या सर्व बाबींचाही पोलीस तपास करत आहेत.
advertisement
गोविंद बर्गे यांच्या निकटवर्तीयांकडून त्यांच्या मानसिक स्थितीची माहिती मिळवून पोलीस तपास पुढे नेण्याची शक्यता आहे. याशिवाय नर्तिका पूजा गायकवाड हिचे अन्य व्यक्तींशी संबंध होते का आणि या घटनेत त्यांचा सहभाग आहे का, याचाही पोलीस तपास करतील.
बर्गेंनी बार्शीत लाखोंचा प्लॉट घेऊन दिला
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गोविंद बर्गे यांनी २१ जानेवारी २०२५ रोजी बार्शी हद्दीतील मिरगणे प्लॉटिंगमध्ये एक प्लॉट पूजा गायकवाड हिच्या नावावर खरेदी केला होता. या प्लॉटची किंमत अंदाजे पावणे सात लाख रुपये असून, खरेदी दस्तावेळी गोविंद स्वतः हजर होते, असेही सांगण्यात येत आहे. नातेवाईकांनी पोलिसांना या प्रकरणात सहभागी असलेल्यांचा शोध घेऊन त्यांना योग्य शिक्षा देण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे स्थानिक राजकारणात आणि समाजात मोठी खळबळ उडाली आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
September 11, 2025 7:02 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कार आतून लॉक, बॅटरीही डाऊन, नर्तिकेच्या नादात जीव देणाऱ्या उपसरपंच प्रकरणाला वेगळं वळण, नातेवाईकाचा मोठा दावा