हृदयद्रावक! क्षणभराचा राग दोघांचा जीव घेऊन गेला, नाकातोंडात पाणी जाऊन दाम्पत्याचा करुण अंत
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Hingoli : हिंगोली शहरालगत असणाऱ्या अंधारवाडीत एक दाम्पत्याचा दुर्दैवी अंत झाला आहे. क्षणभराच्या रागामुळे दोघांचा जीव गेला आहे.
हिंगोली : हिंगोली शहरालगत असणाऱ्या अंधारवाडीत एक दाम्पत्याचा दुर्दैवी अंत झाला आहे. क्षणभराच्या रागामुळे दोघांचा जीव गेला आहे. तर पती-पत्नीच्या वादामुळे एक वर्षांची चिमुकली अनाथ झाली आहे. किरकोळ कारणातून पतीसोबत झालेल्या वादातून पत्नीने रागाच्या भरात घराजवळ असणाऱ्या विहिरीत उडी घेतली. यानंतर पतीने पत्नीला वाचवण्यासाठी स्वत:ही विहिरीत उडी घेतली. पण दोघांचाही करुण अंत झाला आहे. या दाम्पत्याला एक वर्षांची मुलगी आहे. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात हळहळ व्यक्त केलं जात आहे.
मुन्ना शेख आणि सुमेराबी शेख असं मृत पावलेल्या दाम्पत्याचं नाव आहे. हे दाम्पत्य अंधारवाडीच्या प्रवीणनगर परिसरात वास्तव्याला आहे. त्यांना एक वर्षांची एक मुलगी देखील आहे. बुधवारी सकाळी साडे दहाच्या आसपास मुन्ना आणि सुमेराबी यांच्यात किरकोळ कारणातून वाद झाला होता. या वादाचा राग मनात धरून सुमेराबी यांनी घराजवळच्या विहिरीत उडी घेतली.
advertisement
पत्नीने विहिरीत उडी मारल्याचं पाहून तिला वाचवण्यासाठी पती मुन्ना यानेही विहिरीत उडी मारली. पण तो तिला वाचवू शकला नाही. या दुर्दैवी घटनेत दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. काही तरुणांनी विहिरीत उतरून दाम्पत्याचा शोध घेतला. पण बराच काळ दोघांचा मृतदेह सापडत नव्हता. त्यानंतर स्थानिकांनी सुरुवातीला मुन्ना शेख यांचा मृतदेह बाहेर काढला.
advertisement
दरम्यान, या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने सुमेराबी यांचाही मृतदेह बाहेर काढला. यानंतर पोलिसांनी दोघांचाही मृतदेह शवविच्छेदनासाठी हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केला. या प्रकरणाची नोंद हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. दाम्पत्याचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने एक वर्षांची चिमुकली मात्र अनाथ झाली आहे. या घटनेनं अंधारवाडी गावात शोककळा पसरली आहे.
Location :
Hingoli,Maharashtra
First Published :
December 27, 2024 2:25 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/हिंगोली/
हृदयद्रावक! क्षणभराचा राग दोघांचा जीव घेऊन गेला, नाकातोंडात पाणी जाऊन दाम्पत्याचा करुण अंत