Hingoli Lok Sabha : हिंगोलीमध्ये मतदार राजाचा कौल कोणाला? मविआ, महायुती की वंचित
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
हिंगोली लोकसभा मतदासंघात शिवसेना, शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारामध्ये प्रमुख लढत आहे.
हिंगोली, मनीष खरात, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे 26 एप्रिल रोजी हिंगोली लोकसभेचं मतदान पार पडलं. मतदार संघात 63.54 टक्के मतदान झालं. या मतदारसंघात राजकीय पक्षांसह अपक्ष असे एकूण 33 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. महायुतीकडून शिवसेनेचे बाबुराव कदम, महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर तर वंचित बहुजन आघाडीचे डॉ.बी. डी. चव्हाण हे या मतदारसंघातील प्रमुख उमेदवार आहेत.
यंदा कधी नव्हे तो महाराष्ट्रात हिंगोली लोकसभा मतदारसंघ चर्चेत आला. महायुतीतील भाजप व शिवसेना या दोन्ही घटक पक्षांच्या धूसफुशीमुळे व शिवसेनेने विद्यमान खासदार हेमंत पाटील यांची जाहीर केलेली उमेदवारी रद्द करून उमेदवार बदलल्यामुळे हिंगोली मतदारसंघ चांगलाच चर्चेत राहिला.
हिंगोली लोकसभेत जरी एकूण 33 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. परंतु महायुती महाविकास आघाडी व वंचित बहुजन आघाडी या प्रमुख उमेदवारांनीच प्रचाराचा धुरळा उडवून दिला होता. तिनही प्रमुख उमेदवारांच्या प्रचारार्थ मतदारसंघात सभा व रॅलींचे आयोजन करण्यात आले होते. या मतदारसंघात महायुतीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तर महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांनी प्रचारसभा घेतल्या वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी देखील प्रचारसभा घेतली. महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ गोविंदाने रोड शो केला. लोकसभेच्या प्रचारामध्ये राष्ट्रीय व राज्यातील मुद्द्यांसोबत स्थानिक मुद्दे देखील चर्चिले गेले. यामध्ये जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष, उद्योगाच्या बाबतीमध्ये जिल्ह्याचा प्रश्न, बेरोजगारी इत्यादी मुद्द्यांचा समावेश आहे. या मुद्यांबरोबरच एकमेकांवर वैयक्तिक टिका टिपण्णी देखील झाली.
advertisement
हिंगोली लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्षाचे तीन आमदार, एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचा आमदार, एक शिवसेनेचा आमदार असे पाच आमदार महायुतीचे आहेत. तर एक आमदार हा काँग्रेस पक्षाचा आहे. महायुतीत बाबुराव कदम यांची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी भाजप आणि शिवसेनेत धुसफुस सुरू होती. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मनमिळवणी व्हायला वेळ गेला. तर महाविकास आघाडीमध्ये उमेदवारी न मिळालेले शिवसेना ठाकरे गट व काँग्रेसचे काही इच्छुक प्रचारात दिसलेच नाहीत. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा देखील प्रचारामध्ये गाव भेटीवर जोर होता. तरीही एकंदरीत लढत मात्र शिवसेना विरुद्ध शिवसेना अशीच झाल्याची चर्चा आहे. आता हिंगोलीच्या मतदारराजाने तिघांपैकी कोणाला कौल दिला, हे चार जूनला मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.
Location :
Hingoli,Hingoli,Maharashtra
First Published :
May 19, 2024 2:12 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/हिंगोली/
Hingoli Lok Sabha : हिंगोलीमध्ये मतदार राजाचा कौल कोणाला? मविआ, महायुती की वंचित