धनुष्याचं बटण, कमळाची लाईट! नाशिकमध्ये खळबळ, EVM वरून उमेदवाराचा राडा
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Nashik Election 2025 : महापालिका निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी नाशिक शहरात काही मतदान केंद्रांवर गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
नाशिक : महापालिका निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी नाशिक शहरात काही मतदान केंद्रांवर गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. प्रभाग क्रमांक २४ मधील एका मतदान केंद्रावर ईव्हीएम संदर्भात गंभीर आरोप झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांकडून असा दावा करण्यात आला आहे की, धनुष्यबाण या चिन्हासमोर बटण दाबल्यानंतर मशीनवर भाजपच्या चिन्हाचा लाईट लागत असल्याचे मतदारांच्या निदर्शनास आले.
advertisement
ईव्हीएमच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित
हा प्रकार प्रभाग क्रमांक २४ मधील ग्रामदेव प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर घडल्याचे सांगण्यात येत आहे. काही मतदारांनी प्रत्यक्ष मतदान करताना संशयास्पद प्रकार घडल्याचा आरोप करत निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारही दाखल केली आहे. ईव्हीएमच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यामुळे मतदान केंद्रावर काही काळ तणाव निर्माण झाला होता.
advertisement
शिवसेनेच्या उमेदवारांकडून गंभीर आरोप
दरम्यान, शिंदे गटाच्या शिवसेनेच्या उमेदवारांनी आणखी गंभीर आरोप केले आहेत. ईव्हीएमबाबत तक्रार करणाऱ्या मतदारांना धमकावले जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे मतदान प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित होत असून, निष्पक्ष चौकशीची मागणी केली जात आहे. या प्रकरणामुळे काही काळ मतदान केंद्राबाहेर गर्दी वाढली होती आणि पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हस्तक्षेप करावा लागला.
advertisement
दुसरीकडे प्रभाग क्रमांक २४ मधील मॉडर्न हायस्कूलच्या खोली क्रमांक ८ मध्ये ठेवलेल्या ईव्हीएममध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने सकाळी मतदान सुरू होण्यास विलंब झाला. मशीन कार्यान्वित न झाल्याने काही काळ मतदारांना मतदानासाठी थांबावे लागले. निवडणूक कर्मचाऱ्यांनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन पर्यायी व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला.
advertisement
दरम्यान, राज्यभरात आज २९ महानगरपालिकांसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. या निवडणुकीत राज्यभरात एकूण २,८६९ जागांसाठी लढत होत असून तब्बल ३ कोटी ४८ लाख ७९ हजार ३३७ मतदार आपला कौल देणार आहेत.
नाशिकमधील ईव्हीएम संदर्भातील तक्रारी आणि तांत्रिक अडचणींमुळे प्रशासनाची धावपळ वाढली असून, निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शकपणे पार पडावी यासाठी अतिरिक्त दक्षता घेतली जात आहे. या घटनांचा मतदानाच्या एकूण वातावरणावर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
advertisement
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Jan 15, 2026 12:13 PM IST










