Ind vs Pak: पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात युद्धाची मागणी; पण सीमेवरील वास्तव वेगळंच, निवृत्त जवान म्हणतात...
- Reported by:Prashant Pawar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Ind vs Pak: पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानातील संबंध ताणले गेले आहेत. भारतीयांतून पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी होतेय. परंतु, युद्धाबाबत निवृत्त जवानांनी वेगळंच वास्तव मांडलं आहे.
प्रशांत पवार, प्रतिनिधी
बीड: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. सोशल मीडिया, बातम्या, चर्चासत्रे आणि जनभावना यामध्ये पुन्हा एकदा ‘युद्ध हवे की नको?’ या प्रश्नावर जोरदार चर्चा सुरू आहे. अनेकजण पाकिस्तानला कडक प्रत्युत्तर द्यावं, या मतावर आहेत. मात्र प्रत्यक्ष युद्ध काय असतं? सैनिकांना काय सहन करावं लागतं? आणि त्याचा देशावर व कुटुंबांवर काय परिणाम होतो? हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. बीड जिल्ह्यातील टालेवाडी गावचे सेवानिवृत्त सैनिक संतोष बिक्कड आणि विठ्ठल बिक्कड यांनी त्यांच्या अनुभवातून हे वास्तव उलगडून सांगितलं आहे.
advertisement
निवत्त जवान संतोष बिक्कड यांनी भारतीय लष्करात 22 वर्ष सेवा दिली असून त्यांना कारगिल युद्धाचा थेट अनुभव आहे. ते सांगतात “युद्ध म्हणजे केवळ रणगाडे आणि बंदुका नाहीत तर थंडी, भूक, थकवा आणि मृत्यूच सतत सावट असतं. सैनिकांना झोप मिळत नाही अन्न वेळेवर मिळत नाही, बर्फात तासन्तास उभं राहावं लागतं. मानसिक ताण इतका वाढतो की काही वेळा त्यावर मात करणं अवघड होतं. पण देशासाठी लढण्याची जिद्द त्या सगळ्यांवर मात करते.”
advertisement
युद्धकाळातील आव्हान
निवृत्त जवान विठ्ठल बिक्कड यांनी जम्मू-काश्मीरमधील सीमावर्ती भागांमध्ये अनेक वर्ष सेवा केली आहे. ते म्हणतात “कधी 48 तास पाण्याशिवाय तग धरावा लागतो. बॉम्बस्फोट, गोळीबार, हिमवादळ या साऱ्या गोष्टींना रोज सामोरं जावं लागतं. घरच्यांची आठवण होते पण संपर्क होत नाही. दर क्षण शत्रूवर नजर ठेवावी लागते. एक चूक आणि संपूर्ण तुकडी संकटात येते.”
advertisement
युद्ध अंतिम पर्याय
“युद्ध झालं तर फक्त शत्रू मरत नाही. आपल्या बाजूचेही जवान शहीद होतात. त्यांची मुलं पोरकी होतात. त्यामुळे देशभक्तीचा अर्थ फक्त युद्ध नव्हे, तर शांती राखण्यासाठी धोरणात्मक भूमिका घेणं देखील तितकंच गरजेचं आहे. कोणत्याही संघर्षात युद्ध हा अंतिम पर्याय असावा,” असं निवृत्त जवान संतोष बिक्कड म्हणतात.
युद्धाचे दुरगामी परिणाम
पहलगाम हल्ल्याने देशभर अस्वस्थता निर्माण झाली आहे. नागरिक भावनांच्या आहारी जाऊन युद्धाची मागणी करत असले तरी सैनिकांचं वास्तव, त्यांची वेदना आणि त्याग समजून घेणं फार गरजेचं आहे. विठ्ठल बिक्कड म्हणतात, “युद्ध हे जनभावनेवर नाही तर सीमेवरील वस्तुस्थितीवर लढलं जातं. त्यासाठी आधी तयारी केली जाते. युद्ध बातम्यांमध्ये एक दिवसच राहतं, पण त्याचे परिणाम दुरगामी असतात.” त्यामुळे देशवासीयांनी संयम आणि दूरदृष्टी ठेवून निर्णय घ्यावा, असा संदेश त्यांनी दिला.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Bid,Maharashtra
First Published :
May 07, 2025 10:38 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ind vs Pak: पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात युद्धाची मागणी; पण सीमेवरील वास्तव वेगळंच, निवृत्त जवान म्हणतात...








