धनुभाऊंचं मंत्रिमंडळात कमबॅक? 3 वेळा भेटलो म्हणत फडणवीसांचं थेट विधान, नेमकं काय म्हणाले?
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
माणिकराव कोकाटे यांचं कृषीमंत्रीपद जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. तेव्हा कोकाटे यांच्या जागी धनंजय मुंडे यांना संधी मिळणार असल्याच्या चर्चा झाल्या.
नागपूर: विधिमंडळ सभागृहात ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे चांगलेच अडचणीत सापडले. यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागू शकतो, अशा चर्चा झाल्या. आता त्यांच्याकडून कृषीमंत्रीपद काढून त्यांच्याकडे क्रीडा मंत्रीपदाची नवी जबाबदारी देण्यात आली आहे. ज्यावेळी माणिकराव कोकाटे यांचं कृषीमंत्रीपद जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. तेव्हा कोकाटे यांच्या जागी धनंजय मुंडे यांना संधी मिळणार असल्याच्या चर्चा झाल्या.
याच काळात धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली. या भेटीमुळे धनंजय मुंडेंचं पुन्हा मंत्रीमंडळात कमबॅक होणार असल्याच्या चर्चा झाल्या. या सगळ्या चर्चेवर आता फडणवीसांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मंत्रीमंडळात समावेश करण्याबाबतची चर्चा धनंजय मुंडे यांच्या स्तरावर होत नाही, असं वक्तव्य फडणवीसांनी केलं आहे. ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
advertisement
धनंजय मुंडेंनी घेतलेल्या भेटीबाबत विचारलं असता फडणवीस म्हणाले, त्यांनी (धनंजय मुंडेंनी) माझी तीन वेळा भेट घेतली आहे आणि वेगवेगळ्या कारणाने भेट घेतली आहे. कुठल्याही भेटीमध्ये मंत्रिमंडळाबद्दल चर्चा झालेली नाही. मंत्रिमंडळाची चर्चा धनंजय मुंडे यांच्या स्तरावर होत नाही, मंत्रिमंडळाची चर्चा ही मी, अजितदादा आणि एकनाथराव शिंदे करतो.
दरम्यान, गुरुवारी रात्री उशिरा विधिमंडळात रमी खेळणारे माणिकराव कोकाटे यांची कृषिमंत्रीपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. आता त्यांच्याकडे क्रीडा आणि युवक कल्याण खात्याचा पदभार देण्यात आला आहे. तर त्यांच्या जागी इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांची वर्णी लागली आहे. खरंतर, कृषी मंत्रीपद मिळाल्यापासून कोकाटे हे नाराज होते. त्यांनी कृषीमंत्रीपदाची तुलना ओसाड गावच्या पाटीलकीशी केली होती. त्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली होती. आता त्यांच्याकडून कृषी खातं काढून घेण्यात आलं असून त्यांच्याकडे क्रीडा मंत्रीपद देण्यात आलं आहे.
view commentsLocation :
Nagpur,Maharashtra
First Published :
August 01, 2025 1:23 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
धनुभाऊंचं मंत्रिमंडळात कमबॅक? 3 वेळा भेटलो म्हणत फडणवीसांचं थेट विधान, नेमकं काय म्हणाले?