खेळताना अचानक गायब, चिमुकल्यासोबत घडलं भयंकर, शेजारच्या घरात आढळला मृतावस्थेत
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
जळगाव जिल्ह्यातील यावल येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. इथं एका बेपत्ता झालेल्या ६ वर्षीय मुलाचा शेजारील घरात मृतदेह सापडला आहे.
इम्तियाज अहमद, प्रतिनिधी जळगाव: जळगाव जिल्ह्यातील यावल येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. इथं एका बेपत्ता झालेल्या ६ वर्षीय मुलाचा शेजारील घरात मृतदेह सापडला आहे. मागील अनेक तासांपासून मुलाचा शोध घेतला जात होता. पण त्याचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. अनेक तास शोध घेतल्यानंतर शेजारील घरातच मुलाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच तणाव निर्माण झाला आहे. संतप्त जमावाने ज्याच्या घरात मृतदेह आढळल्या त्याच्या घरावर आणि दुकानावर हल्ला केला आहे.
दुकानावर आणि घरावर दगडफेक करत मोठी तोडफोड केली आहे. या प्रकारामुळे शहरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. घटनास्थळी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी देखील केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.
मृत बालकाचे नाव हन्नान खान (वय 6) असे आहे. तो शुक्रवार सायंकाळी घराजवळ खेळत असताना अचानक बेपत्ता झाला होता. मुलगा बेपत्ता झाल्यानंतर मुलाच्या कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. संपूर्ण शहर पिंजून काढलं, पण मुलाचा कुठेच थांगपत्ता लागत नव्हता. अखेर शनिवारी सकाळी, शेजारी राहणाऱ्या बिस्मिल्ला खलिफा यांच्या घरातील दुसऱ्या मजल्यावर एका बंदिस्त कोठीत हन्नानचा मृतदेह आढळला. हा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला.
advertisement
या घटनेमुळे संतप्त झालेल्या जमावाने बिस्मिल्ला खलिफा यांच्या घरावर आणि दुकानावर दगडफेक केली. यामुळे शहरातील बाबूजी पुरा परिसरात तणाव वाढला. पोलिसांनी तात्काळ दंगा नियंत्रण पथकासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला असून, परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. पण हन्नान सोबत काय घडलं? त्याची हत्या कुणी केली? कोणत्या कारणातून केली? त्याचा मृतदेह अशाप्रकारे बंदिस्त कोठीत का लपवला होता? याची कसलीही माहिती अद्याप समोर आली नाही. या प्रकरणाची पोलीस सखोल चौकशी करत आहेत.
Location :
Jalgaon,Maharashtra
First Published :
September 07, 2025 8:37 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
खेळताना अचानक गायब, चिमुकल्यासोबत घडलं भयंकर, शेजारच्या घरात आढळला मृतावस्थेत