जालन्यात संचारबंदी! निवडणूक निकाल जाहीर होताच मोठा निर्णय, कारण काय?
- Reported by:Kale Narayan
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Jalna News: जालन्यातील संचारबंदीचे आदेश शाळा, महाविद्यालय आणि दुकाने-आस्थापना यांना देखील लागू राहणार आहेत.
जालना: नुकतेच राज्यातील महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. यानंतर दुसऱ्याच दिवशी जालन्यात संचारबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. धनगर आरक्षण आंदोलक दीपक बोऱ्हाडे यांना मुंबईतील आझाद मैदान इथे उपोषण आंदोलनास उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली आहे. याचे पडसाद जालना आणि अंबड शहरात उमटण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी जालना आणि अंबड शहरात संचारबंदी आदेश जारी केला आहे. हे आदेश शनिवारी पहाटे 5 ते रात्री 12 वाजेपर्यंत लागू राहणार आहेत.
धनगर समाजाला एस.टी. प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी दीपक बोऱ्हाडे हे मागील अनेक दिवसांपासून प्रयत्न करत आहेत. 26 जानेवारी रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे ते आपल्या समर्थकांसह आंदोलन करणार होते. परंतु, प्रजासत्ताक दिन आणि राज्यात जिल्हा परिषद निवडणुकीची आदर्श आचारसंहिता यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना आंदोलन करण्यास परवानगी नाकारली आहे.
advertisement
न्यायालयाने परवानगी नाकारल्यानंतर बोऱ्हाडे यांचे समर्थक संतप्त झाले असून ते आंदोलन पुढे रेटण्याचा प्रयत्न करू शकतात. तसेच वेगवेगळ्या मार्गाने निषेध नोंदवू शकतात. याबाबत खात्री केल्यानंतर जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी जालना शहर आणि अंबड शहरात संचारबंदी आदेश लागू केला आहे.
advertisement
दरम्यान, हे आदेश शाळा, महाविद्यालय आणि दुकाने-आस्थापना यांना देखील लागू राहणार आहेत. तर शासकीय आणि निमशासकीय कार्यालये, पिण्याचे पाणी आणि सांडपाणी व्यवस्थापन यंत्रणा, दूध वितरण, रेल्वे, दवाखाना आणि मेडिकल, विद्युत पुरवठा आणि प्रसारमाध्यमे यांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
Jan 17, 2026 10:30 AM IST









