'हातवारे करू नका, आवाज खाली करा', रोहित पवारांचा पारा चढला, पोलीस ठाण्यातला VIDEO व्हायरल
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यातील वादाला गुरुवारी गंभीर वळण मिळालं. यानंतर पोलीस ठाण्यात रोहित पवारांचा पारा चढल्याचं देखील बघायला मिळालं.
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यातील वादाला गुरुवारी गंभीर वळण मिळालं. विधानभवन परिसरात पडळकरांच्या काही कार्यकर्त्यांनी आव्हाडांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. या मारहाणीचे व्हिडीओ देखील समोर आले. ज्यात पडळकरांचे कार्यकर्ते आव्हाडांच्या कार्यकर्त्याला मारहाण करताना दिसत आहे. या सगळ्या प्रकरणानंतर रात्री उशिरा पोलिसांनी आव्हाडांच्या ज्या कार्यकर्त्याने मार खाल्ला त्याच नितीन देशमुखला अटक केली.
या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार दोघंही मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गेले. याठिकाणी रोहित पवार आणि तेथील पोलीस अधिकारी यांच्यात बाचाबाची झाल्याची बघायला मिळाली. पोलीस ठाण्यात एक पोलीस अधिकारी रोहित पवार यांच्याशी हातवारे करून बोलत होता. ही बाब रोहित पवारांना खटकली. यानंतर त्यांचा पारा चढला. त्यांनी मोठ्या आवाजात संबंधित पोलिसाला झापलं.
advertisement
"हातवारे करू नका... आवाज खाली करा... शहाणपणा करू नका... बोलता येत नसेल तर बोलू नका, कळलं का?" अशा शब्दात रोहित पवारांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्याला झापलं. यावेळी रोहित पवारांचे कार्यकर्ते देखील आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं. ज्यावेळी पोलिसांनी कारवाई करण्याचे संकेत दिले. तेव्हा रोहित पवारांचा कार्यकर्ते चवथाळले आणि साहेबांना हात लावायचा नाही, अशा भाषेत इशारा दिला. हा सगळा राडा सुरू असताना जितेंद्र आव्हाड देखील घटनास्थळी होते.
advertisement
दरम्यान, आव्हाडांसह काही कार्यकर्त्यांनी मध्यस्थी केल्यानंतर पोलीस ठाण्यातला तणाव निवळला. पण या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ आता समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात रोहित पवार एका पोलीस अधिकाऱ्यावर संताप व्यक्त करताना दिसत आहेत.
आवाज खाली!
रोहितदादा, आव्हाडसाहेब असे नेते हीच कार्यकर्त्यांची खरी ताकद आहे. लढेंगे, जितेंगे! pic.twitter.com/mfwgI0LI3t
— Mahadev Balgude (@Mahadev_Balgude) July 18, 2025
advertisement
रात्री नेमकं काय घडलं?
विधानभवन परिसरात गुरुवारी दुपारी पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी आव्हाडांच्या कार्यकर्त्याला मारहाण केली. याचे पडसाद रात्रभर उमटले. आमदार जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख याला पोलीस रात्री १२ वाजता विधानभवनात अटक केली. मात्र ही गोष्ट जितेंद्र आव्हाड यांना कळताच ते तत्काळ विधानभवन परिसरात पोहोचले आणि पोलिसांच्या गाडीसमोर कार्यकत्यांसह ठिय्या दिला. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आमदार रोहित पवार देखील दाखल झाले जितेंद्र आव्हाड ठिय्या आंदोलनावर ठाम असताना पोलिसांनी दीड वाजता आंदोलकांची धरपकड केली, जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांची गाडी अडवून ठेवली. पण पोलिसांनी आव्हाडांना गाडी समोरून बाजुला खेचत बाहेर काढले आणि नितीन देशमुख यांना घेऊन गेले.
advertisement
वादाची ठिणगी कुठे पडली?
काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी विधान भवनाच्या परिसरात गोपिचंद पडळकर यांना मंगळसूत्र चोर म्हणून डिवचल्यानंतर या वादाला सुरुवात झाली होती. त्यानंतर गुरुवारी गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड आमने सामने आले असता दोघांनी एकमेकांना शिवीगाळ करून धमकी दिली. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याला जिवे मारण्याची धमकी आल्याचा आरोप केला होता. याबाबतचे काही धमकीचे मेसेज त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले. त्यानंतर दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते विधान भवनाच्या आवारातच एकमेकांना भिडल्याने या वादाने गंभीर वळण घेतलं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 18, 2025 11:04 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'हातवारे करू नका, आवाज खाली करा', रोहित पवारांचा पारा चढला, पोलीस ठाण्यातला VIDEO व्हायरल