2 वर्षांच्या मुलीवर खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल, कल्याण पोलिसांचा अजब कारभार
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Kalyan: दोन दिवसांपूर्वी कल्याणच्या मोहने परिसरात दोन गटात राडा झाल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणात दोन वर्षांच्या मुलीवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.
प्रदीप भानगे, प्रतिनिधी कल्याण : दोन दिवसांपूर्वी कल्याणच्या मोहने परिसरात दोन गटात राडा झाल्याची घटना समोर आली होती. फटाके फोडण्याच्या कारणातून दोन गट आपसात भिडले होते. दोन्ही बाजुने एकमेकांवर दगडफेक करण्यात आली होती. यात काही महिला गंभीर जखमी झाल्या होत्या. यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या प्रकरणात आता कल्याण पोलिसांचा सावळा गोंधळ समोर आला आहे.
कल्याणच्या मोहने परिसरात झालेल्या दगडफेक प्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटातील २५ ते ३० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे यात आरोपी केलेल्यांमध्ये एका २ वर्षीय चिमुरडीचं देखील नाव आलं आहे. तिच्यावर पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांचा हा अजब कारभार समोर आल्यानंतर नातेवाईकांकडून संताप व्यक्त केला जातोय. "निष्पाप चिमुरडीचं गुन्ह्यातून नाव वगळा, आम्हाला न्याय द्या", अशी मागणी मुलीच्या कुटुंबीयांनी केली आहे.
advertisement
यावर आता पोलिसांनी देखील स्पष्टीकरण दिलं आहे. ही घटना घडल्यानंतर तक्रारदाराने दिलेल्या माहितीच्या आधारे आम्ही गुन्हा दाखल केला. याची चौकशी सुरू आहे, असं पोलिसांनी म्हटलं.
मुलीच्या आईची प्रतिक्रिया
या संपूर्ण प्रकरणावर मुलीच्या आईनं प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं की, "माझं नाव संजना अविनाश कसबे. दोन दिवसांपूर्वी फटाक्यांच्या स्टॉलवर भांडण झालं होतं. फिर्यादीचा आणि आमचा काहीही संबंध नाही. त्यांनी आमच्या एरियात येऊन दगडफेक केली. यात आमच्या काही महिलांना लागलं. या प्रकरणी आम्ही पोलीस ठाण्यात धाव घेतली. तेव्हा पोलिसांनी आम्हाला दवाखान्याची चिठ्ठी दिली. त्यानुसार आम्ही दवाखान्यात गेलो. डॉक्टरांनी आमच्यावर उपचार केले. यानंतर आम्ही घरी आलो."
advertisement
"पण दुसऱ्या दिवशी आम्हाला कळालं की माझ्या २ वर्षांच्या मुलीवर ३०७ कलमांतर्गत खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी माझ्या मुलीचं वय देखील बघितलं नाही, तरीही त्यांनी मुलीवर गुन्हा दाखल केला. पोलीस नक्की काय करतात? आम्हा गरीबांना न्याय देणार की नाहीत? पोलिसांनी आरोपींना शिक्षा द्यावी," अशी मागणी मुलीच्या आईनं केली.
view commentsLocation :
Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali),Thane,Maharashtra
First Published :
October 25, 2025 8:51 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
2 वर्षांच्या मुलीवर खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल, कल्याण पोलिसांचा अजब कारभार


