Road Safety अपघातानंतरचा 'गोल्डन अवर' म्हणजे काय? या काळात नेमकी काय काळजी घ्यावी? Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
रस्ता सुरक्षा सप्ताहात रस्ते अपघात आणि मृत्यू टाळण्यासाठी सुरक्षेच्या मुद्द्यांबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यावर भर दिला जातो.
साईप्रसाद महेंद्रकर / प्रतिनिधी
कोल्हापूर : एखादा अपघात पाहिल्यानंतर तो बघणाऱ्याच्या मनात भीती निर्माण होत असते. मात्र त्या अपघातानंतरचा काही काळ हा गोल्डन अवर म्हणून ओळखला जातो. हा गोल्डन अवर नेमका कोणता असतो, त्याचबरोबर त्या गोल्डन अवरमध्ये नेमकी काय काळजी घेतली पाहिजे? याबाबत कोल्हापुरातील डॉ. मधुर जोशी यांनी माहिती दिली आहे. डॉ. जोशी हे राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय येथील शस्त्रक्रिया विभागाचे सहाय्यक प्राध्यापक आहेत.
advertisement
रस्ते अपघात ही सध्या एक मोठी समस्या आहे. भारतात रस्ते अपघातात लाखो लोकांचा मृत्यू होतो. त्यामुळेच राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह राबविला जातो. यामध्ये होणारे रस्ते अपघात आणि मृत्यू टाळण्यासाठी सुरक्षेच्या मुद्द्यांबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यावर भर दिला जातो. याच मुद्यांमधील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच गोल्डन अवर ही संकल्पना आहे. अपघतग्रस्तांना तात्काळ मिळणारी वैद्यकीय मदत त्यांचा जीव वाचण्यास मदातशीर ठरु शकते. याच काळाला गोल्डन अवर म्हणून संबोधले जाते. याबाबत देखील नागरिकांना माहिती असणे गरजेचे आहे.
advertisement
गोल्डन अवर म्हणजे काय?
खरंतर अपघात कोणत्याही प्रकारचा असला तरी त्यामध्ये अपघातग्रस्ताला तातडीची मदत मिळणे आवश्यक असते. जर अपघातानंतर पुढच्या तासाभरात त्या व्यक्तीवर वैद्यकीय उपचार मिळाले नाहीत, तर त्या व्यक्तीला पुढे अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. बऱ्याचदा त्यांना जीवालाही मुकावे लागते. त्यामुळेच अपघातानंतरचा पुढचा एक तास हा अपघातग्रस्तांसाठी गोल्डन अवर अर्थात सुवर्णकाळ असतो, असे डॉ. जोशी यांनी सांगितले आहे.
advertisement
गोल्डन अवरमध्ये काय घ्यावी काळजी?
गोल्डन अवरमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अपघात घडलेल्या ठिकाणी आजूबाजूच्या लोकांनी आपली जबाबदारी ओळखायला हवी. अपघातानंतर लगेच त्या अपघातग्रस्तावर प्राथमिक उपचार सुरू व्हावेत यासाठी त्यांनी प्रयत्न करायला हवेत. बऱ्याचदा अपघातानंतर संबंधित व्यक्ती व्यवस्थित आहे, असे वाटू शकते. मात्र त्या व्यक्तीला शरिरातील अंतर्गत भागात मार लागला असण्याची शक्यता असते. अशा रुग्णांना जितक्या लवकर रूग्णालयात उपचारासाठी नेता येईल, तितक्या लवकर न्यावे.
advertisement
गोल्डन अवर ही संकल्पना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न सध्या WHO देखील करत आहे. या गोल्डन अवरमध्ये उपचारासाठी डॉक्टर किंवा रुग्णालये ही सतर्क असतातच. मात्र सामान्य नागरिकांनीही त्याबाबत जागरूक असणे गरजेचे आहे. त्यामध्ये सीपीआर ही संकल्पनाही सर्वांना माहीत असायला हवे. प्रत्येक अपघातग्रस्ताची नाडी, हृदयाचे ठोके, श्वासांची गती अशा सगळ्यांबाबत माहिती घेऊन त्या व्यक्तीला लवकर उपचाराची गरज किती आहे, हे जाणून घेणे सगळ्यात महत्त्वाचे असते. त्यामुळेच सीपीआर देणे ही गोष्ट शाळा, कॉलेज अशा सर्व विद्यार्थ्यांना माहीत असायला हवी, असेही डॉ. जोशी यांनी सांगितले.
advertisement
मदत करणाऱ्या व्यक्तीला पोलिस देत नाहीत त्रास
बऱ्याचदा अपघातग्रस्तांना रुग्णालयात पोहोचल्यानंतर मदत करणाऱ्या व्यक्तीला पोलीस किंवा प्रशासनाकडून त्रास होण्याची शक्यता असते. या कारणामुळे सामान्य नागरिक अपघातग्रस्तांना मदत करण्यास पुढे सरसावत नाहीत. मात्र आता सुधारित मोटार वाहन कायद्यानुसार पोलिस अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांवर कोणतीही कायदेशीर कारवाई करु शकत नाहीत. एखाद्या जखमी व्यक्तीचा रुग्णालयात जाताना मृत्यू जरी झाला, तरी मदत करणाऱ्या व्यक्तीवर पोलीस गुन्हा दाखल करू शकत नाहीत, अशी माहिती डॉ. जोशी यांनी दिली.
advertisement
अपघातस्थळी तात्काळ 108 ला करावा फोन
view commentsएखादा अपघात पाहिल्यानंतर बरेचजण आजकाल त्या ठिकाणी चर्चा करत, फोटो किंवा व्हिडिओ काढत बसतात. मात्र त्या व्यतिरिक्त सगळ्यात आधी 108 या नंबरवर फोन करुन रुग्णवाहिकेला बोलवणे सर्वात योग्य असते. 108 नंबरवर फोन केल्यास तात्काळ एखादी रुग्णवाहिका अपघातस्थळी पोहोचू शकते. त्यामुळेच अपघातग्रस्ताचा जीव वाचण्यास मदत होते. त्यामुळे ही गोष्ट देखील लक्षात घेणे गरजेचे आहे, असेही डॉ. जोशी यांनी स्पष्ट केले आहे.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
January 27, 2024 3:37 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
Road Safety अपघातानंतरचा 'गोल्डन अवर' म्हणजे काय? या काळात नेमकी काय काळजी घ्यावी? Video

