Loksabha Elections 2024 : रावेरवरून काँग्रेस-राष्ट्रवादीत रस्सीखेच, खडसेंच्या दाव्याची नाना पटोलेंनी काढली हवा!
- Published by:Shreyas
Last Updated:
महाविकास आघाडीत लोकसभेच्या जागा वाटपाची चर्चा सुरु असतानाचं उत्तर महाराष्ट्रातील रावेर लोकसभेवरून वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रावेर : महाविकास आघाडीत लोकसभेच्या जागा वाटपाची चर्चा सुरु असतानाचं उत्तर महाराष्ट्रातील रावेर लोकसभेवरून वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसेंनी या मतदार संघातून निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली होती. मात्र खडसेंचा दावा काँग्रेसच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी रावेरच्या जागेवरून खडसेंना टोला लगावला आहे.
'रावेर लोकसभेची जागा जिंकण्याचे मेरिट हे काँग्रेसचे आहे, त्यामुळे ही मेरिट वर जागा ही काँग्रेसच्याच वाट्याला येईल', असं नाना पटोले म्हणाले आणि त्यांनी खडसेंचा दावा खोडून काढला.
काँग्रेस आघाडीच्या जागा वाटणीत रावेर लोकसभा मतदार संघ हा काँग्रेसकडे आहे. तर भाजप-शिवसेना युतीत ही जागा भाजपच्या वाटणीला आली आहे. गेल्या वेळी एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसेंनी काँग्रेसच्या उल्हास पाटलांचा पराभव केला होता, पण आता राजकीय समीकरण बदललं आहे. एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्य आहेत, तर रक्षा खडसे अद्यापही भाजपातचं आहेत, त्यामुळे भाजप रक्षा खडसेंना पुन्हा उमेदवारी देणार का? हे अद्यापही स्पष्ट नाही. मात्र काँग्रेसनं रावेरच्या जागेवर आतापासूनचं दावा मजबूत करण्यास सुरुवात केली आहे.
advertisement
'आमचे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर उल्हास पाटील हे सुद्धा ही जागा लढवण्याबाबत बोलू शकतात. याबाबतचा योग्य निर्णय वरिष्ठ घेतील. वरच्या पातळीवर कुठलाही निर्णय झालेला नाही, त्यामुळे खाली कुणी काही बोलत असेल त्याला काही अर्थ नाही', असं नाना पटोले म्हणाले आहेत.
महाविकास आघाडीत रावेरच्या जागेवरू काँग्रेस - राष्ट्रवादीत रस्सीखेच होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप रावेरमधून कुणाला उमेदवारी देणार? यावर इथल्या राजकारणाची दिशा ठरणार आहे. बदललेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर भाजप रक्षा खडसेंना पुन्हा तिकीट देणार का ? हाच खरा प्रश्न आहे.
view commentsLocation :
Raver,Jalgaon,Maharashtra
First Published :
January 02, 2024 11:29 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Loksabha Elections 2024 : रावेरवरून काँग्रेस-राष्ट्रवादीत रस्सीखेच, खडसेंच्या दाव्याची नाना पटोलेंनी काढली हवा!


