बंगालच्या उपसागरात 'डीप डिप्रेशन' सक्रिय; दक्षिण भारताला पावसाचा तडाखा, महाराष्ट्रावर काय होणार परिणाम
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
विदर्भात शीत लहरी, नागपूर गोंदिया गडचिरोलीत तापमान घसरले. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ, दक्षिण भारतात पावसाचा इशारा. मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला.
उत्तर भारतातून येणाऱ्या बोचऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात हवामानाचा लपंडाव सुरू आहे. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, विदर्भात आगामी काही दिवस थंडीचा कडाका कायम राहणार असून तिथे शीत लहरीची स्थिती निर्माण झाली आहे. नागपूर, गोंदिया आणि गडचिरोली या भागात तापमानाचा पारा सरासरीपेक्षा खाली घसरल्याने नागरिकांना दिवसाही ऊबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागत आहे.
विदर्भात थंडी असली तरी, उर्वरित महाराष्ट्रात मात्र तापमानात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील ४८ तासांत किमान तापमान २ ते ३ अंशांनी वाढू शकते. यामुळे रात्रीचा गारवा काहीसा कमी होईल. मात्र, उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि जळगाव परिसरात पहाटेच्या वेळी धुक्याचे सावट पाहायला मिळत असून, वाहनधारकांना प्रवासात काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
पश्चिम बंगालच्या उपसागरात दक्षिणेला चक्रीवादळ आलं आहे. पदुचेरीपासून 810 किमी अंतरावर आहे. पुढचे 48 तास महत्त्वाचे आहेत. हे चक्रीवादळ श्रीलंकेच्या दिशेनं पुढे सरकत आहेत. तर केरळपासून काही अंतरावर सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालं आहे. त्यामुळे मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे कोकणातही काही अंशी दिवसा ढगाळ वातावरण राहणार असून कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये कडाक्याची थंडी वाढणार आहे. विदर्भ आणि मध्य प्रदेशातील सीमारेषेवरील गावांमघ्ये दाट धुकं आणि हाडं गोठवणाऱ्या थंडीचा अलर्ट दिला आहे.
advertisement
हवामानातील या बदलांमागे बंगालच्या उपसागरातील सक्रिय झालेली प्रणाली मुख्य कारण ठरत आहे. बंगालच्या उपसागराच्या दक्षिण-पश्चिम भागात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आता 'डीप डिप्रेशन'मध्ये रूपांतरित झाले आहे. ही प्रणाली सध्या ताशी १८ किलोमीटर वेगाने पश्चिम-उत्तर-पश्चिम दिशेला सरकत असून, आगामी ३६ तासांत ती श्रीलंका किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे. या प्रणालीमुळे दक्षिण भारतात पावसाचा जोर वाढणार आहे.
advertisement
महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर सध्या पावसाची चिन्हे नसली तरी, दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे हवेत आर्द्रता जाणवत आहे. यामुळे दक्षिण कोकण आणि कोल्हापूर, सांगली परिसरात अंशतः ढगाळ वातावरण राहू शकते. दिवसाचे तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचल्याने दुपारी उन्हाचा चटका आणि पहाटे गारवा असा दुहेरी अनुभव नागरिक घेत आहेत.
advertisement
मच्छिमारांसाठी हवामान विभागाने विशेष इशारा दिला आहे. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातील काही भाग खवळलेला राहणार असल्याने आगामी ५ दिवस मच्छिमारांनी खोल समुद्रात जाऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, उत्तरेकडील राज्यांमध्ये दाट धुके असल्याने महाराष्ट्रातून उत्तर भारताकडे जाणाऱ्या विमान आणि रेल्वे सेवांवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रवाशांनी वेळापत्रक तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 09, 2026 6:48 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बंगालच्या उपसागरात 'डीप डिप्रेशन' सक्रिय; दक्षिण भारताला पावसाचा तडाखा, महाराष्ट्रावर काय होणार परिणाम










