Maharashtra Elections 2024 : ज्यांच्या विजयासाठी मविआने रान उठवलं, काँग्रेसच्या त्याच आमदाराचा शिंदेंच्या गटात प्रवेश
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Maharashtra Election 2024 : महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ज्यांच्या विजयासाठी रान उठवलं तेच आमदार आता शिंदेंच्या गटात प्रवेश करणार आहे.
मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. दिवाळीचे औचित्य साधत आता पक्षांतर सुरू झाले आहे. मुंबईत आज भाजपने पहिला बॉम्ब फोडताना मुंबईतील काँग्रेसचा मोठा नेता आपल्या गळाला लावला आहे. मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी भाजपात प्रवेश केला. तर, दुसरीकडे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेदेखील काँग्रेसला आणखी एक धक्का देणार आहे. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ज्यांच्या विजयासाठी रान उठवलं त्याच आमदाराने आता शिंदेंच्या गटात प्रवेश केला आहे. कोल्हापूर उत्तरच्या आमदार जयश्री जाधव आज शिवसेनेत प्रवेश केला आहे.
आमदार जयश्री जाधव या काँग्रेसच्या आमदार आहेत. त्यांचे पती चंद्रकांत जाधव याच मतदारसंघाचे आमदार होते. त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने जयश्री जाधव यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. ही पोटनिवडणूक जिंकण्यासाठी भाजपने कंबर कसली होती. तर, कोल्हापुरात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोर लावला होता. अटीतटीच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी विजय मिळवला होता. आता मात्र जयश्री जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.
advertisement
जयश्री जाधव यांना कोल्हापूर उत्तरमधून या निवडणुकीत उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे जयश्री जाधव या नाराज होत्या. अखेर त्यांनी आता काँग्रेसचा हात सोडत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. जयश्री जाधव यांच्या पक्ष प्रवेशामुळे काँग्रेसला धक्का बसणार आहे. जाधव यांच्या पक्ष प्रवेशामुळे स्थानिक राजकीय गणितेही बदलणार आहेत. या मतदारसंघातून शिंदे गटाचे माजी आमदार राजेश क्षीरसागर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर काँग्रेसने उमेदवार बदलत मधुरीमा राजे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे जयश्री जाधव या नाराज झाल्या आणि त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.
advertisement
मुख्यमंत्र्यांनी काय म्हटले?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, जयश्री जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्या आधीच्या शिवसैनिक होत्या आणि आता त्यांची घरवापसी झाली आहे. सरकारने महिलांसाठी केलेले काम याला प्रभावित होवून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यांना महिलांसाठी काम करायचे आहे. निवडणुकीचे तिकीट मिळाले नाही तरी त्यांनी प्रवेश केला आहे. जयश्री जाधव यांच्या मुळे कोल्हापूरात शिवसेनेची ताकद वाढणार असून आमचा पक्ष सर्व सामान्यांचा पक्ष आहे. आमच्याकडे जो काम करेल तो पुढे जाईल असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटले.
view commentsLocation :
Kolhapur,Maharashtra
First Published :
Oct 31, 2024 12:39 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Elections 2024 : ज्यांच्या विजयासाठी मविआने रान उठवलं, काँग्रेसच्या त्याच आमदाराचा शिंदेंच्या गटात प्रवेश











