Sharad Pawar : निवडणुकीत तिसऱ्यांदा करिष्मा दाखवण्यास अपयश, शरद पवारांचं काय चुकलं?
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार यांच्या कामगिरीकडे लक्ष लागले होते. मात्र, शरद पवार तिसऱ्यांदा करिष्मा दाखवण्यास अपयशी ठरले आहेत.
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीचे धक्कादायक न निकाल समोर येत आहेत. विधानसभा निवडणुकीत मोठा उलटफेर झाल्याचे दिसत असून दुसरीकडे महायुतीच्या लाटेत विरोधी बाकावरील महाविकास आघाडी उद्धवस्त झाल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार यांच्या कामगिरीकडे लक्ष लागले होते. मात्र, शरद पवार तिसऱ्यांदा करिष्मा दाखवण्यास अपयशी ठरले आहेत.
विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काका शरद पवारांपासून फारकत घेतली. शरद पवारांनी स्थापन केलेल्या पक्षावर दावा करत अजित पवारांनी निवडणूक आयोगात धाव घेतली होती. निवडणूक आयोगाने देखील अजित पवारांचा दावा मान्य केला आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे अधिकृत पक्ष नाव आणि चिन्ह अजित पवारांना दिले. अजित पवारांसोबत 40 आमदार गेले होते. त्यामुळे शरद पवारांसमोर पुन्हा एकदा नव्याने पक्ष उभारण्याचे आवाहन होते. याआधी नव्याने पक्ष बांधणी करणाऱ्या शरद पवारांकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, त्यांना या निवडणुकीत आपला करिष्मा दाखवता आला नाही.
advertisement
शरद पवार हे पुलोदचे मुख्यमंत्री असताना त्यांना जवळपास 50 आमदारांनी सोडचिठ्ठी दिली. त्यानंतरच्या निवडणुकीत पवारांनी सोडून गेलेल्या जवळपास सगळ्याच उमेदवारांचा पराभव केला आणि दमदारपणे पुनरागमन केले. त्यानंतर 2014 च्या निवडणुकीत शरद पवारांना अनेकजण सोडून गेले होते. केंद्रात सत्तेत आलेल्या मोदींच्या, भाजपच्या झंझावातात राष्ट्रवादीची पडझड झाली. त्यानंतर 2019 मध्येही पवारांना अनेकजण सोडून गेले. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत पवारांनी दमदार कामगिरी करत 50 हून अधिक आमदार निवडून आणले. त्यानंतर आता 2024 मध्ये पुतण्या अजित पवार यांनी आमदारांसह पक्षच ताब्यात घेतला. त्यामुळे या निवडणुकीत शरद पवार कमाल करतील अशी अपेक्षा होती.
advertisement
शरद पवारांचं काय चुकलं?
अजित पवार पक्ष सोडून गेल्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवारांनी जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली. यामध्ये पवारांना चांगले यश आले. शरद पवारांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादीने चांगले यश मिळवले. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत शरद पवार आपला करिष्मा दाखवतील अशी चर्चा सुरू झाली. मात्र, आजच्या निवडणूक निकालानंतर पवारांना आजवरच्या मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागले आहे.
advertisement
पश्चिम महाराष्ट्र हे शरद पवारांचे बलस्थान समजले जाते. मात्र, त्यांच्याच बालेकिल्ल्यात पराभवाचा धक्का बसला आहे. अजित पवार त्यांच्यापेक्षा सरस ठरले. राज्याच्या राजकारणाचा अंदाज ज्यांना आधी येतो, विरोधकांनाही आपल्या चाली कळू न देणारे शरद पवार यांच्यासाठी हा पराभव मोठा असल्याची चर्चा आहे.
कल्याणकारी योजनांचा फायदा
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेसह इतर लोककल्याणकारी योजना लागू केल्या. योजनांची आक्रमक अंमलबजावणी आणि जोरदार प्रचार यामुळे विरोधकांचे महागाई, हमी भावाचा मुद्दा निष्प्रभ ठरला.
advertisement
प्रस्थापित उमेदवारांचे आव्हान?
अजित पवारांसोबत अनेक दिग्गज, प्रस्थापित नेते, आमदार गेले. पण, त्या तुलनेत शरद पवारांकडे अपवाद वगळता कमी ताकदीचे नेते होते. मात्र, तरीही शरद पवारांनी मेहनत घेत जोरदार प्रचार केला. शरद पवार यांना अपेक्षित यशापासून दूर व्हावे लागले.
धार्मिक ध्रुवीकरणाचा फटका
निवडणुकीचा प्रचार संपण्यास अवघे काही दिवस असताना भाजपकडून मुस्लिम धर्मगुरू सज्जाज नोमानी यांचा एक व्हिडीओ व्हायरल करण्यात आला. यामध्ये वोट जिहादचे आवाहन होत असल्याचा मुद्दा भाजपकडून अधोरेखित करण्यात आला. एक है तो सेफ आणि बटेंगें तो कटेंगे या मुद्यावर सुरू असलेल्या प्रचाराला आणखी बळ मिळाले. भाजपकडून सुरू असलेल्या या प्रचाराला प्रत्युत्तर देण्याची मोठी संधी पवार आणि विरोधकांना मिळाली नाही.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 23, 2024 1:23 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sharad Pawar : निवडणुकीत तिसऱ्यांदा करिष्मा दाखवण्यास अपयश, शरद पवारांचं काय चुकलं?


