Maharashtra Politics : महायुतीचा महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला! नाराज आमदारांची लॉटरी लागणार?
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Mahayuti Mamandal : सत्ताधारी महायुतीमध्ये निधी वाटपावरुन धुसफूस सुरू असताना दुसरीकडे महत्त्वाच्या निर्णयावर तिन्ही पक्षांचे एकमत झाले आहे.
उदय जाधव, प्रतिनिधी, मुंबई: सत्ताधारी महायुतीमध्ये निधी वाटपावरुन धुसफूस सुरू असताना दुसरीकडे महत्त्वाच्या निर्णयावर तिन्ही पक्षांचे एकमत झाले आहे. राज्यात महायुती सरकारमधील तिन्ही पक्षांनी महामंडळ वाटपाच्या प्रक्रियेला अंतिम स्वरूप दिलं असून, समन्वय समितीत यावर जवळपास एकमत झालं आहे. मंत्रीपदाची वाट पाहणाऱ्या आणि हुलकावणी मिळालेल्या नाराज आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना महामंडळ अध्यक्षपदाची ऑफर देण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांचा विचार करता, महायुतीतील नाराज आमदारांचा रोष वाढू नये यासाठी हे पाऊल उचलले जात असल्याचे म्हटले जात आहे. शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) या तिन्ही पक्षांतील नाराज आमदारांनी महामंडळ अध्यक्षपदासाठी लॉबिंग सुरू केलं आहे.
बुधवारी रात्री, शिवसेना शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानी महायुतीच्या समन्यवय समितीची बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेना शिंदे गटाकडून शंभूराजे देसाई, उदय सामंत, तर भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ आदींची उपस्थिती होती. महायुतीच्या समन्वय समितीची आठवड्यातील ही दुसरी बैठक होती.
advertisement
मुंबई महानगर मधील महामंडळासाठी रस्सीखेच...
विशेषतः मुंबई आणि एमएमआर रिजनमधील प्रमुख महामंडळांच्या अध्यक्षपदासाठी मोठी रस्सीखेच सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुंबई म्हाडा (MHADA), सिडको (CIDCO), एमएमआरडीए, एमटीडीसी (MTDC) अशा प्रभावी महामंडळांच्या अध्यक्षपदावर लक्ष केंद्रीत झालं आहे. शिवसेना व भाजप आमदारांमध्ये यासाठी जोरदार चढाओढ सुरू असून, पक्षांतर्गत गटबाजीही समोर येत आहे.
advertisement
सर्वाधिक 4 ते 5 वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या वरिष्ठ नेत्यांनाच अध्यक्षपदाची संधी देण्यात येणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. अशा नेत्यांमध्ये मुंबई, ठाणे, पुणे आणि कोकणातील काही माजी मंत्र्यांची नावे चर्चेत आहेत.
महामंडळ अध्यक्षपदाच्या निर्णयानंतर आता महायुतीतील तणाव काहीसा निवळण्याची शक्यता आहे. मात्र, अंतिम यादीवरून पुन्हा नवे वाद उद्भरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 03, 2025 9:51 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Politics : महायुतीचा महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला! नाराज आमदारांची लॉटरी लागणार?