ZP Election: गावगाड्यात निवडणुकीचा धुरळा! पहिल्या टप्प्यात 'या' जिल्हा परिषदांची निवडणूक? पाहा यादी
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
ZP Eleciton : या पत्रकार परिषदेत राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याची अधिकृत घोषणा होण्याची दाट शक्यता आहे.
मुंबई: महाराष्ट्रातील ग्रामीण राजकारणाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकांसाठी मुदतवाढ दिल्यानंतर, राज्य निवडणूक आयोग आज सायंकाळी ४ वाजता मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याची अधिकृत घोषणा होण्याची दाट शक्यता आहे.
दोन टप्प्यांत होणार निवडणुका
राज्यात जादा आरक्षणाचे (५० टक्क्यांहून अधिक) प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. अशा परिस्थितीत, ज्या जिल्ह्यांमध्ये आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या आत आहे, तिथे निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषदांबाबत सुप्रीम कोर्टातील २१ जानेवारीच्या निकालानंतर निर्णय घेतला जाईल. निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक प्रक्रिया दोन टप्प्यांत राबवली जाईल. पहिल्या टप्प्यात कायदेशीर पेच नसलेल्या जिल्ह्यांचा समावेश असेल, तर उर्वरित २० जिल्हा परिषदांचा निर्णय न्यायालयाच्या अंतिम आदेशानंतर घेतला जाईल.
advertisement
पहिल्या टप्प्यातील 'हे' आहेत महत्त्वाचे जिल्हे:
पहिल्या टप्प्यात प्रामुख्याने कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्ह्यांमध्ये मतदान पार पडेल. यात खालील १२ जिल्हा परिषदांचा समावेश असण्याची शक्यता आहे.
कोकण विभाग: रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.
पुणे विभाग: पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.
छत्रपती संभाजीनगर विभाग: छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर.
१२५ पंचायत समित्यांचे भवितव्य ठरणार
advertisement
जिल्हा परिषदांसोबतच संबंधित जिल्ह्यांतील एकूण १२५ पंचायत समित्यांसाठीही पहिल्या टप्प्यात मतदान होईल. यात रायगडमधील सर्वाधिक १५, तर रत्नागिरी (९), सिंधुदुर्ग (८), पुणे (१३), सातारा (११), सोलापूर (११), कोल्हापूर (११), सांगली (१०), छत्रपती संभाजीनगर (९), परभणी (९), धाराशिव (८) आणि लातूरमधील १० पंचायत समित्यांचा समावेश आहे.
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मतदानाची शक्यता
advertisement
निवडणूक आयोगाने मतदानाची प्रक्रिया १० फेब्रुवारी २०२६ पूर्वी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. सर्वोच्च न्यायालयाने १५ फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढवून दिल्याने प्रशासकीय तयारीला वेग आला आहे. आजच्या पत्रकार परिषदेनंतर आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने राजकीय पक्षांची धाकधूक वाढली आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 13, 2026 2:23 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ZP Election: गावगाड्यात निवडणुकीचा धुरळा! पहिल्या टप्प्यात 'या' जिल्हा परिषदांची निवडणूक? पाहा यादी










