ED Office Fire : मध्यरात्री ईडीच्या कार्यालयाला भीषण आग, कोणत्या हायप्रोफाइल केसवर होणार परिणाम?
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Fire at ED Office Mumbai : कार्यालय बंद असताना लागलेल्या आगीमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. या आगीत अनेक महत्त्वाच्या हायप्रोफाइल केसशी संबंधित फाइल्स, कागदपत्रे आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मुंबई : रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयाला भीषण आग लागली. ही भीषण आग जवळपास 10 तास धुमसत होती. कार्यालय बंद असताना लागलेल्या आगीमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. या आगीत अनेक महत्त्वाच्या हायप्रोफाइल केसशी संबंधित फाइल्स, कागदपत्रे आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मुंबईतील बॅलार्ड इस्टेटमधील एका खाजगी मालकीच्या इमारतीत ईडीच्या झोन-१ कार्यालयात रविवारी पहाटे आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 10 तासांचा वेळ अग्निशमन दलाच्या जवानांना लागला. या भीषण आगीत काही हाय-प्रोफाइल प्रकरणांचे तपास रेकॉर्ड हरवले असल्याची भीती निर्माण झाली आहे. या हायप्रोफाइल केसमध्ये फरार उद्योगपती मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी तसेच राजकारणी छगन भुजबळ आणि अनिल देशमुख यांच्याशी संबंधित प्रकरणाचा समावेश आहे.
advertisement
कागदपत्रे, कॉम्प्युटरही भस्मसात?
या आगीमुळे सध्या सुरू असलेल्या प्रकरणांच्या तपासावर कोणता परिणाम होईल, याची अद्याप स्पष्टता आली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासाशी संबंधित कागदपत्रे, कॉम्प्युटरलाही आगीची झळ बसली आहे. काही वस्तू भस्मसात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
चौकशीशी संबंधित असलेले कागदपत्रे आणि डिजीटल रेकोर्ड या कार्यालयात आहे. मात्र, बहुतांशी कागदपत्रे हे डिजिटलाइज्ड असल्याने ईडीला कागदपत्रे मिळवण्यास अडचणी येणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
advertisement
ईडीने ज्या प्रकरणांमध्ये आरोपपत्रे दाखल केली आहेत त्यांचे मूळ तपास रेकॉर्ड न्यायालयात सादर केले आहेत, त्यांच्या प्रती स्वतःकडे ठेवल्या आहेत. ईडीने कार्यालयात जबाब घेण्यासाठी बोलावलेल्या साक्षीदारांच्या चौकशीवर या आगीचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
फर्निचर, कागदपत्रांमुळे आग वाढली...
अग्निशमन दलाच्या म्हणण्यानुसार, इमारतीत पहाटे २.३० च्या सुमारास आग लागली. त्यावेळी इमारतीत फक्त कॅन्टीन कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचारी उपस्थित होते. कोणालाही कोणतीही दुखापत झाली नाही. अग्निशमन दलाने सांगितले की ही आग तपास संस्थेच्या लाकडी फर्निचर आणि इतर कार्यालयीन पायाभूत सुविधांमध्ये मर्यादित होती. कॉमन पॅसेजमध्ये ठेवलेल्या फर्निचर आणि बाल्कनीमुळे अग्निशमन कार्यात अडथळा निर्माण झाला. सुरुवातीला आग लेव्हल-१ (मायनर) म्हणून घोषित करण्यात आली होती, जी लेव्हल-३ (मेजर) पर्यंत वाढवण्यात आली.लाकडी फर्निचर व्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात असलेले कागदपत्रे आगीला कारणीभूत ठरली असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानाने दिली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 28, 2025 9:34 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ED Office Fire : मध्यरात्री ईडीच्या कार्यालयाला भीषण आग, कोणत्या हायप्रोफाइल केसवर होणार परिणाम?