Accident : साखरपुड्याला जाणाऱ्या वऱ्हाडावर काळाचा घाला, मिनी बस पलटी; 35 जखमी
- Published by:Prachi Amale
Last Updated:
छत्रपती संभाजीनगर येथील वऱ्हाडी साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी बसने मालेगावकडे जात होते.
बब्बू शेख , प्रतिनिधी
नांदगाव : नांदगाव-मालेगाव मार्गावर आज सकाळी भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने जाणारी प्रवासी मिनी बस नागा-साक्या धरणाजवळ पलटी झाल्याने तब्बल 35 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये महिला आणि लहान बालकांचा समावेश असून, त्यापैकी चौघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील वऱ्हाडी साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी बसने मालेगावकडे जात होते. नागा-साक्या धरणाजवळील वळणावर समोरून आलेल्या वाहनाने अचानक कट मारला. या दरम्यान चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि मिनी बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली. अपघात इतका भीषण होता की, बसमधील प्रवाशांचा क्षणभर गोंधळ उडाला.
advertisement
चार जण गंभीर जखमी
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी मदतकार्याला सुरुवात करत प्रवाशांना बाहेर काढले. उपलब्ध असलेल्या वाहनांच्या मदतीने जखमींना तात्काळ उपचारासाठी नांदगावच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. काही गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी मालेगाव आणि छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मोठी जीवितहानी टळली
दरम्यान, या अपघातामुळे नांदगाव-मालेगाव मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. घटनास्थळी मोठी गर्दी झाल्याने पोलिसांना वाहतूक सुरळीत करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागले. नागरिकांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठी जीवितहानी टळली, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
advertisement
घटनास्थळी पंचनामा करत अपघाताची नोंद
या अपघातात किरकोळ जखमींची संख्या अधिक असून, त्यांच्यावर प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात येत आहे. मात्र, गंभीर जखमींची प्रकृती लक्षात घेता वैद्यकीय पथकाने सतत देखरेख ठेवली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत अपघाताची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 14, 2025 9:44 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Accident : साखरपुड्याला जाणाऱ्या वऱ्हाडावर काळाचा घाला, मिनी बस पलटी; 35 जखमी