कोरोना काळ गाजवलेले ब्रिटनचे डॉ. संग्राम पाटील चौकशीसाठी पुन्हा पोलिसांच्या ताब्यात, लंडनला जाण्यापासून रोखले
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
डॉ. संग्राम पाटील हे मूळचे जळगावचे. अनेक वर्षांपासून ते ब्रिटनमध्ये वैद्यकीय सेवा बजावतात. ब्रिटनमध्येच ते स्थायिक झाले आहेत. भाजप नेत्यांवरील टीकेच्या आरोपांखाली त्यांची चौकशी सुरू आहे.
मुंबई : कोरोना काळात सर्वत्र भीती पसरलेली असताना रुग्णांना आणि त्याचबरोबर सर्वसामान्यांना सातासमुद्रापल्याडहून आधार देणारे डॉक्टर, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे कट्टर पुरस्कर्ते, लोकशाहीवादी कार्यकर्ते डॉ. संग्राम पाटील यांना मुंबई पोलिसांनी पुन्हा चौकशासाठी ताब्यात घेतले आहे. सोमवारी सकाळी त्यांच्या कुटुंबातील सदस्य लंडनला निघालेले असताना पोलिसांनी संग्राम पाटील यांना ताब्यात घेऊन पुन्हा चौकशीला सुरुवात केली. चौकशीच्या नावाखाली गेल्याच आठवड्यात त्यांना १५ तास पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवण्यात आल्याचा आरोप आहे.
डॉ. संग्राम पाटील हे मूळचे जळगावचे. अनेक वर्षांपासून ते ब्रिटनमध्ये वैद्यकीय सेवा बजावतात. ब्रिटनमध्येच ते स्थायिक झाले आहेत. भारतातील राजकीय- सामाजिक घडामोडींवर त्यांची करडी नजर असते. केंद्र आणि राज्य सरकार तसेच स्वायत्त संस्थांच्या न पटणाऱ्या निर्णयांविरोधात ते रोखठोकपणे आपली मते मांडत असतात. समाज माध्यमांवरून त्यांना पाहणारा आणि ऐकणारा प्रेक्षक वर्गही मोठा आहे. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात गेली काही वर्षे ते आवाज उठवत आहेत.
advertisement
भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेत्याच्या बदनामीच्या आरोपाखाली मागील आठवड्यात त्यांना चौकशीसाठी पाचारण करण्यात आले. मुंबई विमानतळाहूनच त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. मुंबईतील ना.म.जोशी पोलीस स्टेशनमध्ये जवळपास १५ तास त्यांची चौकशी करण्यात आली होती.
भाजप नेत्यांच्या विरोधात लिहिल्याचा आरोप, पोलिसांकडून कसून चौकशी
संग्राम पाटील आणि त्यांचे कुटुंब सोमवारी पुन्हा लंडनला निघालेले असताना मुंबई पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्या विरोधात सर्क्युलर नोटीस देखील काढण्यात आलेली आहे. 353/2 चा गुन्हा त्यांच्या नावावर नोंद करण्यात आला आहे. भाजप महाराष्ट्र प्रदेशचे सोशल मीडिया सहसंयोजक निखील श्यामराव भामरे यांच्या तक्रारीवरून त्यांची चौकशी लावण्यात आलेली आहे. भाजप नेत्यांविरोधात समाज माध्यमांवर आक्षेपार्ह लिखाण केल्याचा आरोप संग्राम पाटील यांच्यावर करण्यात आला आहे.
advertisement
मी न्यायालयात दाद मागणार- संग्राम पाटील
माझ्यावर साधी एनसी नाही. त्याच्याविरोधात पोलिसांनी सर्क्युलर नोटीस काढली आहे. परदेशी नागरिकाला चौकशीच्या नावाखाली त्रास देणे हे सरळ सरळ आंतरराष्ट्रीय न्यायालयांच्या नियमांचे उल्लंघन असल्याचे सांगत याविरोधात न्यायालयात मी दाद मागणार असल्याचे संग्राम पाटील म्हणाले.
कोण आहेत संग्राम पाटील?
डॉ. संग्राम पाटील हे भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक आहेत
advertisement
डॉ. पाटील हे लंडनमध्ये वैद्यकीय प्रॅक्टिस करतात
कोरोना काळात अतिशय भीतीचे वातावरण असताना त्यांनी व्हिडीओतून लोकांना धीर देण्याचे काम केले
अनेक राजकीय आणि सामाजिक मुद्यांवर संग्राम पाटील निर्भीडपणे व्यक्त होत असतात
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 19, 2026 3:36 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कोरोना काळ गाजवलेले ब्रिटनचे डॉ. संग्राम पाटील चौकशीसाठी पुन्हा पोलिसांच्या ताब्यात, लंडनला जाण्यापासून रोखले









