महाराष्ट्राच्या 'फुनसूक वांगडू'च्या लेकीची कमाल, 3 वर्षांची जगातली लहान संशोधक, OMG बुकमध्ये नोंद
- Reported by:Pragati Bahurupi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
गोजिरी अजिंक्य कोतावार हिने जर्मन इंटरनॅशनल पेटंट मिळवत जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. इतक्या लहान वयात आंतरराष्ट्रीय स्तरावर पेटंट मिळवणारी ती जगातील सर्वात लहान संशोधक ठरली आहे.
नागपूर : नागपूर येथील अवघ्या तीन वर्षांच्या गोजिरी अजिंक्य कोतावार हिने जर्मन इंटरनॅशनल पेटंट मिळवत जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. इतक्या लहान वयात आंतरराष्ट्रीय स्तरावर पेटंट मिळवणारी ती जगातील सर्वात लहान संशोधक ठरली आहे. 12 डिसेंबर 2021 रोजी जन्मलेल्या गोजिरीच्या नावावर 20 नोव्हेंबर 2025 रोजी या संशोधनाची अधिकृत नोंद झाली. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत OMG बुक ऑफ रेकॉर्ड्समध्येही सर्वात तरुण आंतरराष्ट्रीय पेटंट धारक म्हणून नोंद करण्यात आली आहे.
खेळण्यातून सुचली कल्पना
गोजिरीला पाण्यासोबत खेळण्याची खूप आवड आहे. ती सतत काही न काही खेळ करीत असते. बबल्स तर तिचा आवडीचा विषय आहे. याच खेळातून तिच्या नावावर इतका मोठा विक्रम झाला आहे. ती खेळत असतानाच वडिलांना कल्पना सुचली आणि त्यांनी मुलीच्या नावावर पेटंटसाठी अप्लाय केलं, असं तिचे वडील सांगतात.
advertisement
गोजिरीच्या नावावर नोंद झालेल्या या संशोधनामध्ये विशेष उपकरणाच्या सहाय्याने विविध आकारांचे पाण्याचे बुडबुडे (साबणाचे फुगे) तयार करण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे. या उपकरणामुळे त्रिकोण, चौकोन, तारा अशा विविध आकारांमध्ये फुगे तयार करता येतात. या कल्पकतेमुळे विज्ञानातील प्रयोगशीलतेबरोबरच लहान वयातील सर्जनशीलतेचे उत्तम उदाहरण समोर आले आहे.
फुनसूक वांगडू म्हणून वडिलांची ओळख
गोजिरीचे वडील डॉ. अजिंक्य कोतावार हे स्वतः संशोधक असून त्यांनी मुलीच्या कुतूहलाला योग्य दिशा देत या प्रकल्पात मार्गदर्शन केले. लहानपणापासूनच मुलांमध्ये प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची आणि समजून घेण्याची उत्सुकता असते. त्या कुतूहलाला योग्य दिशा दिल्यास भविष्यात मोठे संशोधन घडू शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले. अजिंक्य यांच्या नावे 48 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पेटंट आहेत. तसेच महाराष्ट्रातील फुनसूक वांगडू म्हणून त्यांना ओळखले जाते.
advertisement
शेती आणि शिक्षण या क्षेत्रात त्यांचे फार मोठे कार्य आहे. त्याकरिता पद्मश्रीसाठी सुद्धा त्यांचे नामांकन झाले आहे. प्रयोगातून शिक्षण ही संकल्पना ते महाराष्ट्रात रुजविण्याकरिता त्यांनी यवतमाळ येथे ऊबुंटू या प्रयोगशील शाळेची निर्मिती सुद्धा केली आहे. तेथे विद्यार्थ्यांना अनेक संशोधन शिकविले जाते.
आई प्रांजली कोतावार यांनीही गोजिरीच्या आवडी-निवडी ओळखून तिला विविध उपक्रमांमध्ये सहभागी करून घेतले. गोजिरीला नवीन गोष्टी अनुभवण्याची आणि शिकण्याची खूप आवड आहे. तिच्या या गुणांना प्रोत्साहन देत राहिलो तर भविष्यात ती संशोधन क्षेत्रात मोठे यश मिळवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
advertisement
गोजिरी सध्या नागपूरमधील एका प्री-स्कूलमध्ये शिक्षण घेत असून, तिच्या या यशामुळे संपूर्ण परिसरात अभिमानाचे वातावरण आहे. एवढ्या लहान वयात मिळवलेले हे यश इतर मुलांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.
Location :
Nagpur,Maharashtra
First Published :
Mar 17, 2026 4:45 PM IST
मराठी बातम्या/नागपूर/
महाराष्ट्राच्या 'फुनसूक वांगडू'च्या लेकीची कमाल, 3 वर्षांची जगातली लहान संशोधक, OMG बुकमध्ये नोंद








