MIM, इस्लामिक पार्टीची जादू चालणार की भाजप-शिवसेना भगवा फडकवणार? मालेगावचा किंग कोण होणार?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Malegoan ELection 2025 : राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली असून, उत्तर महाराष्ट्रातील राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी मालेगाव महानगरपालिका पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे.
नाशिक : राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली असून, उत्तर महाराष्ट्रातील राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी मालेगाव महानगरपालिका पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. जवळपास अडीच ते तीन वर्षांपासून सुरू असलेली प्रशासकीय राजवट संपुष्टात येत असून, आता 21 प्रभागांतील 84 जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यामुळे मालेगावच्या स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
advertisement
मालेगाव महानगरपालिका 1100 कोटींचे बजेट
सुमारे 1100 कोटी रुपयांच्या वार्षिक अंदाजपत्रकाची मालेगाव महानगरपालिका ही उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांपैकी एक मानली जाते. आगामी निवडणुकीत 21 प्रभागांतून 84 नगरसेवक निवडले जाणार असून, त्यासोबत पाच स्वीकृत सदस्यांची नियुक्ती होणार आहे. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी आवश्यक आकडेमोड आणि युती-आघाड्यांचे राजकारण अधिकच रंगण्याची शक्यता आहे.
advertisement
मालेगावचा इतिहास
मालेगाव हे नाशिक जिल्ह्यातील एक महत्त्वाचे औद्योगिक आणि व्यापारी शहर म्हणून ओळखले जाते. हातमाग व कापड उद्योग, व्यापारी बाजारपेठा आणि दाट लोकवस्ती ही शहराची वैशिष्ट्ये आहेत. वाढती लोकसंख्या आणि शहरीकरणामुळे सुरुवातीला अस्तित्वात असलेली नगरपरिषद अपुरी पडू लागली. परिणामी 17 डिसेंबर 2001 रोजी मालेगाव नगरपरिषदेला अधिकृतपणे महानगरपालिकेचा दर्जा देण्यात आला. त्यानंतर मालेगाव महानगरपालिका Bombay Provincial Municipal Corporations Act, 1949 अंतर्गत कार्यरत झाली.
advertisement
2022 मध्ये प्रशासकीय राजवट
मालेगाव महापालिकेची शेवटची सार्वत्रिक निवडणूक मे 2017 मध्ये पार पडली होती. नियमानुसार 2022 मध्ये पुढील निवडणूक अपेक्षित होती. मात्र, विविध कारणांमुळे निवडणूक न होता 13 जून 2022 पासून महापालिकेवर प्रशासकीय राजवट लागू करण्यात आली. सुरुवातीला तत्कालीन आयुक्त भालचंद्र गोसावी प्रशासक म्हणून कार्यरत होते, तर डिसेंबर 2023 पासून विद्यमान आयुक्त रवींद्र जाधव हे प्रशासक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून मालेगाव महापालिका लोकप्रतिनिधींविना चालवली जात आहे.
advertisement
मालेगाव महानगरपालिका 2017 साली काँग्रेस सत्तेवर
2017 च्या निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकून सत्ता स्थापन केली होती. त्या काळात दिवंगत माजी आमदार रशीद शेख यांच्या पत्नी ताहेरा शेख या महापौर होत्या. नंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने स्थानिक राजकारणात मोठे बदल झाले. 2017 मधील निवडणुकीत काँग्रेसला 28, राष्ट्रवादी काँग्रेसला 26, शिवसेनेला 13, भाजपला 9, AIMIM ला 7 तर जनता दलाला काही जागा मिळाल्या होत्या.
advertisement
मालेगाव महानगरपालिका लढत कशी असणार?
निवडणुकीत भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पार्टी, इस्लाम पार्टी आणि एमआयएम यांच्यात सामना होणार आहे. यात इस्लाम पार्टी, समाजवादी पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती झाली असून 'मालेगाव सेक्युलर फ्रंट'ची स्थापना करून त्याद्वारे ते 84 जागांवर लढणार आहे स्थानिक प्रश्न, विकासकामे, प्रशासकीय राजवटीतील कारभार आणि धार्मिक-राजकीय समीकरणे या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहेत.
advertisement
मालेगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी कुणाचे किती उमेदवार मैदानात?
एमआयएम - 57
इस्लामिक पार्टी - 46
सपा - 20
भाजप - 25
शिवसेना - 24
राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प) - 5
मालेगावची राजकीय ओळख राज्यात वेगळी मानली जाते. येथे सुरुवातीपासूनच स्थानिक नेते, अपक्ष गट आणि सामाजिक संघटनांचा प्रभाव राहिला आहे. अल्पसंख्याकबहुल शहर असल्याने मुस्लिम नेतृत्वाचा प्रभाव महत्त्वाचा ठरतो. कालांतराने AIMIM या पक्षाने शहराच्या राजकारणात ठोस स्थान निर्माण केले. याउलट काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव हळूहळू कमी झाला, तर भाजप आणि शिवसेनेला मर्यादित यश मिळाले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 11, 2026 1:12 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
MIM, इस्लामिक पार्टीची जादू चालणार की भाजप-शिवसेना भगवा फडकवणार? मालेगावचा किंग कोण होणार?











