नाशिकचा कायापालट! 1136 कोटींचा 'रोड मॅप' ठरला; 29 रस्त्यांचे रूपडे पालटणार, प्लॅन काय?
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Nashik News: केवळ रस्तेच नव्हे, तर शहराच्या कनेक्टिव्हिटीसाठी पाच नवीन पूल देखील उभारले जाणार आहेत.त्यामुळे शहराचा चेहरामोहरा बदलणार आहे.
नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहराच्या पायाभूत सुविधांना मोठी गती मिळणार आहे. शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी महापालिका प्रशासनाने कंबर कसली असून, तब्बल 1136 कोटी रुपये खर्चून 29 ठिकाणच्या रस्त्यांचे नूतनीकरण केले जाणार आहे. मात्र, ही विकासकामे सुरू असताना शहरवासीयांना काही काळ वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार असून, कमीत कमी वेळेत ही कामे पूर्ण करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे.
पहिल्या टप्प्यात 18 रस्त्यांचा 'श्रीगणेशा'
कुंभमेळ्याच्या नियोजनानुसार, महापालिकेने एकूण 29 रस्त्यांच्या कामांचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 18 रस्त्यांच्या कामांना प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. उर्वरित 7 रस्त्यांच्या कामांनाही लवकरच हिरवा कंदील मिळणार असून, निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. मार्च 2027 पर्यंत रस्ते, पूल, घाट आणि रुग्णालयांची सर्व कामे पूर्ण करण्याची डेडलाईन प्रशासनाने निश्चित केली आहे.
advertisement
नियोजनाला 'कात्री', पण कामात 'बचत'
बांधकाम विभागाने सुरुवातीला 56 रस्ते कामांचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, सिंहस्थ प्राधिकरणाने त्यातील अत्यंत महत्त्वाच्या 28 कामांना मंजुरी दिली. विशेष म्हणजे, या रस्ते कामांच्या नियोजनात महापालिकेने 16 टक्के (सुमारे 125 ते 150 कोटी रुपये) बचत केली आहे. या वाचलेल्या निधीतून आणखी एका जादा रस्त्याचे काम हाती घेणे शक्य झाले आहे.
advertisement
पाच नवे पूल उभारणार
केवळ रस्तेच नव्हे, तर शहराच्या कनेक्टिव्हिटीसाठी पाच नवीन पूल देखील उभारले जाणार आहेत. यामुळे कुंभमेळ्यादरम्यान येणाऱ्या भाविकांच्या आणि स्थानिक नागरिकांच्या वाहतुकीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल.
"सध्या 18 ठिकाणी कामे वेगाने सुरू असून लवकरच सात नवीन कामांना सुरुवात होईल. एकूण 1136 कोटींच्या निधीतून रस्ते आणि पाच पुलांची उभारणी केली जात आहे. मार्च 2027 पर्यंत ही सर्व कामे पूर्ण करण्याचे आमचे नियोजन असल्याचे मनपा शहर अभियंता संजय अग्रवाल यांनी सांगितले.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Jan 29, 2026 8:53 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
नाशिकचा कायापालट! 1136 कोटींचा 'रोड मॅप' ठरला; 29 रस्त्यांचे रूपडे पालटणार, प्लॅन काय?










