shantigiri Maharaj : शांतीगिरी महाराज अपक्ष लढण्यावर ठाम! नाशिकमध्ये कोणाचं बिघडणार गणित?
- Published by:Rahul Punde
Last Updated:
shantigiri Maharaj in Nashik Loksabha :शांतीगिरी महाराज यांचा मोठा भक्त परिवार नाशिकमध्ये आहे. त्यामुळे मतांचे विभाजन महायुतीच्या उमेदवाराला त्रासदायक ठरू शकते.
नाशिक (लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी) : नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीमध्ये उमेदवाराचा तिढा अद्याप कायम आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात शांतिगिरी महाराज यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. शांतिगिरी महाराज यांची मनधरणी करण्यासाठी महायुतीच्या नेत्यांकडून प्रयत्न केले जात आहे. मात्र, हे सगळे प्रयत्न निष्फळ ठरत आहे. शांतिगिरी महाराजांनी उमेदवारी कायम ठेवली तर यांचा फटका कोणाला बसेल हे पाहणे महत्त्वाचे आहे.
देवभूमी नाशिकमधील लोकसभा मतदारसंघात तीन साधुमहतांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. मात्र, या सगळ्यात सर्वाधिक चर्चेत आले ते म्हणजे शांतिगिरी महाराज. शांतिगिरी महाराज यांनी यापूर्वी छत्रपती संभाजी नगर मधून लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र, त्यावेळी शांतिगिरी महाराज यांना मोठ्या मताधिक्याने पराभव स्वीकारावा लागला होता. आता शांतिगिरी महाराज पुन्हा नाशिक लोकसभेच्या मैदानात उतरल्याने हिंदुत्ववादी मतांचं विभाजन महायुतीचा उमेदवाराला अडचणीचं ठरू शकते. त्यामुळे त्यांची मनधरणी केली जात आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी देखील शांतिगिरी महाराजांची भेट घेत त्यांनी थांबावं अशा प्रकारची विनंती केली.
advertisement
गिरीश महाजन यांनी शांतिगिरी महाराज यांची भेट घेतल्यानंतरही शांतिगिरी महाराज नाशिक लोकसभा निवडणूक लढण्यावर ठाम आहे. आमचा मोठा भक्त परिवार नाशिकमध्ये आहे आणि या भक्त परिवाराच्या जोरावर आपण नाशिकची जागा लढू आणि जिंकू असा विश्वास शांतिगिरी महाराजांना आणि त्यांच्या भक्तांना आहे.
advertisement
नाशिक लोकसभा मतदारसंघातून शांतिगिरी महाराज यांनी उमेदवारी केल्यास हिंदुत्ववादी मतांचे विभाजन होईल असा अंदाज महायुतीच्या नेत्यांना आहे. त्यामुळे शांतिगिरी महाराजांनी निवडणूक लढवू नये अशी भूमिका महायुतीच्या नेत्यांची आहे. त्यासाठी शांतिगिरी महाराजांची मनधरणी देखील केली जात आहे. तर धुळे आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात शांतिगिरी महाराजांचा मोठा भक्त परिवार असल्याने सर्वच पक्षांचे उमेदवार शांतिगिरी महाराज यांची भेट घेऊन पाठिंबा मिळवण्यासाठी आग्रही आहे. त्यामुळे शांतिगिरी महाराज नाशिकच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी चांगलेच प्रकाश झोतात आले. मात्र, निवडणुकीच्या आखाड्यात शांतिगिरी महाराजांना अपक्ष निवडणूक लढल्यास यश मिळेल अशी शक्यता कमीच आहे, असं मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहे, त्यामुळे त्यांनी निवडणूक लढू नये, असं महायुतीच्या नेत्यांना वाटतं. मात्र, आता निवडणुकीत नेमकं काय होतं हे बघणं महत्त्वाचं असेल.
view commentsLocation :
Nashik,Maharashtra
First Published :
April 30, 2024 3:31 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
shantigiri Maharaj : शांतीगिरी महाराज अपक्ष लढण्यावर ठाम! नाशिकमध्ये कोणाचं बिघडणार गणित?


