'माझं स्वत:चं गणित...', महापालिका पराभवावर अजित पवारांची मोठी प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील पराभवानंतर अजित पवारांनी प्रसारमाध्यमांपासून अंतर राखलं होतं. पण आता पहिल्यांदाच ते मीडियासमोर आले.
महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचा सुफडा साफ झाला आहे. कोणत्याच महानगर पालिकेत राष्ट्रवादीला एकहाती सत्ता मिळाली नाही. अजित पवार यांनी पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये संपूर्ण ताकद लावली होती. ते अनेक दिवस इथं ठाण मांडून बसले होते. इथं त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत देखील युती केली होती. पण त्यांना अपेक्षित यश मिळवता आलं नाही. महापालिका निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला.
या पराभवानंतर अजित पवारांनी प्रसारमाध्यमांपासून अंतर राखलं होतं. पण आता पहिल्यांदाच ते मीडियासमोर आले. त्यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगर पालिकेतील पराभवावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी आपला अंदाज चुकल्याची कबुली दिली. शिवाय त्यांनी या दोन्ही महापालिकेत विजयी ठरलेल्या भाजपचं कौतुक केलं.
अजित पवार नक्की काय म्हणाले?
पिंपरी चिंचवडमधील पराभवावर प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले, "मतदारराजा महत्त्वाचा असतो. प्रयत्न करणं प्रत्येक राजकीय पक्षाचं काम असतं. ज्यांनी त्यांनी प्रयत्न केलं. पण भाजपला चांगलं यश मिळालं. त्यामुळे भाजपला मनापासून अभिनंदन करतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली सगळ्या निवडणुका पार पडल्या. त्यांना खूप चांगला प्रतिसाद मिळाला. इतरांचा त्यात पराभव झाला. माझं स्वत:चं गणित असं असतं की पराभवाने खचून जायचं नसतं. पुन्हा त्यात आपलं काम करत राहायचं."
advertisement
निवडणुकीतील पराभवाची नेमकी कारणं काय आहेत? असा सवाल विचारला असता अजित पवार म्हणाले, "अरे बाबा निकालाला अजून २४ तास पण झाले नाहीत. पहाटे तीन वाजेपर्यंत काही जागांचे निकाल लागले. या निकालाबाबत आम्ही सगळे बसू. माहिती घेऊ. काय झालं कसं झालं, यावर चर्चा करू. मीडिया पण म्हणत होता की चांगलं वातावरण आहे. जसे आमचे अंदाज चुकले, तसे मीडियाचे पण अंदाज चुकले. पण ठीक आहे. मतदारराजा महत्त्वाचा असतो."
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Baramati,Pune,Maharashtra
First Published :
Jan 17, 2026 1:28 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'माझं स्वत:चं गणित...', महापालिका पराभवावर अजित पवारांची मोठी प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?








