नाशकात डोळे झाकून विश्वास ठेवला, शिंदेसेनेला 'त्या' पॅटर्नने दिला मोठा धक्का, अपयशाचं खरं कारण आलं समोर
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Nashik Election 2025 : राज्यातील सत्ताधारी युतीत असलेल्या भाजपने नाशिकमध्ये स्वबळाचा मार्ग स्वीकारत स्वतंत्र भूमिका घेतल्याने त्याचे पडसाद शिवसेना (शिंदेगट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यावर स्पष्टपणे उमटले.
नाशिक : राज्यातील सत्ताधारी युतीत असलेल्या भाजपने नाशिकमध्ये स्वबळाचा मार्ग स्वीकारत स्वतंत्र भूमिका घेतल्याने त्याचे पडसाद शिवसेना (शिंदेगट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यावर स्पष्टपणे उमटले. भाजपपासून वेगळे होत शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस (अस) सोबत आघाडी करत तब्बल १०९ जागांवर उमेदवार दिले. त्यापैकी किमान ५० जागांवर ताकदीने लढण्याचा निर्धार करण्यात आला होता. मात्र निकाल पाहता, शिवसेनेला अपेक्षेपेक्षा खूपच कमी यश मिळाले असून २० च्या आतच उमेदवार निवडून आले. त्यामुळे ‘मॅजिक फिगर’ तर दूरच, साधी चाळीशीही गाठता न आल्याने पक्षाच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या अपयशामागे अनेक कारणे पुढे येत आहेत. मंत्री दादा भुसे यांच्यावर नाशिक महानगरपालिकेसह मालेगाव महानगरपालिकेचीही अतिरिक्त जबाबदारी असल्याने ते पूर्ण क्षमतेने नाशिकमध्ये लक्ष केंद्रित करू शकले नाहीत. त्याचप्रमाणे शहरातील प्रमुख नेते अजय बोरस्ते, बंटी तिदमे, विलास शिंदे यांसारखे नेते आपापल्या प्रभागातील प्रचारात अडकून पडल्याने शहरव्यापी समन्वय साधला गेला नाही. याचा थेट फटका पक्षाच्या एकूण कामगिरीला बसल्याचे चित्र दिसून आले.
advertisement
त्र्यंबक पॅटर्न ठरला अपयशी
खरे तर याआधी नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने केलेली कामगिरी आणि तथाकथित ‘त्र्यंबक पॅटर्न’ नाशिकमध्ये पुन्हा यशस्वी ठरेल, या अपेक्षेवर पक्षाची रणनीती आधारलेली होती. मात्र महापालिका निवडणुकीतील मतदारांचा कौल वेगळाच ठरला. स्थानिक प्रश्न, उमेदवारांची प्रतिमा आणि संघटनात्मक ताकद या मुद्द्यांवर शिवसेना अपेक्षित प्रभाव पाडू शकली नाही.
यशस्वी ठरलेले मुद्दे
या निवडणुकीत शिवसेनेने काही बाबींमध्ये योग्य निर्णय घेतले. पक्षातील प्रमुख चेहरे आणि माजी नगरसेवकांना प्राधान्याने उमेदवारी देण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचारादरम्यान ‘नाशिकच्या भूमीची सेवा आई म्हणून करेन’ असे भावनिक आवाहन केले. तसेच ‘लाडक्या बहिणीचा भाऊ’ अशी प्रतिमा उभी करत शिंदे यांचे वैयक्तिक मार्केटिंग करण्यात आले, ज्याचा काही प्रमाणात फायदा पक्षाला झाला.
advertisement
अपयशी ठरलेली रणनीती
मात्र अनेक बाबींमध्ये पक्षाची गणिते चुकली. कुंभमेळ्यासह नाशिक शहराच्या विकासासाठी नगरविकास खाते एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे, हा मुद्दा प्रभावीपणे मांडण्यात आला, पण त्याचा अपेक्षित फायदा झाला नाही. तसेच त्र्यंबकेश्वर आणि दवळा येथील नगराध्यक्षांना प्रचारासाठी बोलावून खान्देशी मतदारांना साद घालण्याचा प्रयत्न उलट पक्षाच्या अंगलट आला. स्थानिक मतदारांना बाहेरील नेतृत्वाची साद फारशी रुचली नाही, असे निकालातून स्पष्ट झाले.
advertisement
पुढील रणनीती, सत्तेत की विरोधात?
आता शिवसेना (शिंदेगट) पुढील भूमिकेकडे लक्ष देत आहे. मुंबईत युतीत लढून सत्ता राखण्यात यश आले असल्याने, जर राज्यस्तरावरून निर्णय झाला आणि भाजपने नाशिकमध्ये सत्तेत सहभागी होण्यास होकार दिला, तर शिवसेना सत्तेत सहभागी होऊ शकते. मात्र भाजपकडून अनुकूल निर्णय न झाल्यास शिवसेनेला नाशिकमध्ये विरोधी बाकावर बसावे लागणार आहे. त्यामुळे नाशिकमधील पुढील राजकीय समीकरणे पूर्णपणे राज्यस्तरीय नेतृत्वाच्या निर्णयावर अवलंबून असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 17, 2026 12:57 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नाशकात डोळे झाकून विश्वास ठेवला, शिंदेसेनेला 'त्या' पॅटर्नने दिला मोठा धक्का, अपयशाचं खरं कारण आलं समोर









