Sharad Pawar : 'नरेंद्र मोदींपेक्षा जास्त लीड तर...', बारामती गॅरंटीवरून शरद पवारांनी डिवचलं
- Published by:Shreyas
Last Updated:
लोकसभा निवडणुकीतल्या घवघवीत यशानंतर शरद पवार बारामतीमधल्या गावांमध्ये जनसंवाद सभा घेत आहेत. लोणी भापकर गावातल्या सभेत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला.
चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी
पुणे : लोकसभा निवडणुकीतल्या घवघवीत यशानंतर शरद पवार बारामतीमधल्या गावांमध्ये जनसंवाद सभा घेत आहेत. लोणी भापकर गावातल्या सभेत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला. बारामतीच्या निवडणुकीची सगळ्यांनाच चिंता होती, इथे काय होणार? पण मला खात्री होती आणि तेच झालं. पंतप्रधान मोदींपेक्षा जास्त लीड बारामतीकरांनी सुप्रिया सुळेंना दिला याचा आनंद आहे, असं म्हणत शरद पवारांनी नरेंद्र मोदींना डिवचलं आहे.
advertisement
'सगळीकडे चर्चा होती, बारामतीमध्ये काय होणार, पण मला विश्वास होता. या निवडणुकीत सुप्रिया सुळेंना मोठं मतदान करतील ही खात्री होती. पंतप्रधान मोदी 1.50 लाख मतांनी निवडून आले आणि तुमचा उमेदवार 1.80 लाख मतांनी निवडून आला. मोदींना माहिती नाही बारामती गॅरंटी काय असते', असा टोलाही शरद पवारांनी लगावला.
'माझं आणि मोदींचं काही भांडण नाही, त्यांनी काय माझा बांध कोरलेला नाही, पण त्यांचं धोरण चुकीचं आहे म्हणून विरोध आहे. त्यांचे धोरण शेतकऱ्यांच्या हिताचं नाही. मागे एकदा ते बारामतीला आले आणि सांगितलं की माझं बोट धरून ते राजकारणात आले, पण ते काही खरं नव्हतं. मोदींचं धोरण शेतकऱ्यांच्या हिताचं नाही, म्हणून त्यांना विरोध आहे', असं शरद पवार म्हणाले.
advertisement
'पिकवणाऱ्याने पिकवलं नाही तर खाणारा काय खाईल? पिकवणारा उद्ध्वस्त झाला तर खाणारा उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. पंतप्रधान राज्यात येतात आणि एकाच व्यक्तीला लक्षात ठेवतात. यातून सुटका करायची असेल तर त्यांच्या हातातून सत्ता काढून घ्यावी लागेल. मी ठरवलं आहे की राज्यात बदल करायचा, महाराष्ट्राचे राज्य हातात घ्यायचं', अशी टीका शरद पवारांनी केली आहे.
advertisement
'तुम्हाला लोकांना काही लोकांनी निवडणुकीमध्ये दमदाटी केली, असं मी ऐकलं, पण तुम्ही जे करायचं तेच केलं. लोकसभेत तालुक्यातले पुढारी नेमके कुठे गेले तेच कळायचं नाही. इतके दिवस आमच्या आजूबाजूला असणारे पुढारी तिकडे गेले पण तुम्ही लोकांनी बरोबर निकाल दिलात, असाच निकाल आपल्याला विधानसभेलाही द्या', असं आवाहन शरद पवारांनी केलं आहे.
advertisement
'जनाई सिराई आणि पुरंदर उपसा या दोन्ही योजना त्यावेळी मी मुख्यमंत्री असताना आणल्या होत्या. पण माझ्या पश्चात त्या योजना पूर्णत्वास नेण्यासाठी सरकारने काहीच केलं नाही, म्हणूनच या दोन्ही योजना पूर्ण करायच्या असतील तर राज्यातलं सरकार बनवावं लागेल. या भागात मी पाणी आणतो, पण कृपाकरून जमिनी विकू नका', असं शरद पवार म्हणाले.
Location :
Baramati,Pune,Maharashtra
First Published :
June 20, 2024 4:50 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sharad Pawar : 'नरेंद्र मोदींपेक्षा जास्त लीड तर...', बारामती गॅरंटीवरून शरद पवारांनी डिवचलं