अमित शाह यांच्यासमोरच पोलीस कर्मचाऱ्याकडून मिसफायर, अजितदादांच्या अंत्यसंस्कारावेळी घडला प्रकार, VIDEO
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारावेळी बारामतीमध्ये पोलिसांकडून मिसफायर झाला, अमित शाह, देवेंद्र फडणवीस, शरद पवार उपस्थित होते, सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्र आधीच शोकाकुल असताना, त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी एक अत्यंत धक्कादायक प्रकार घडला. बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार सुरू असताना, पोलिसांकडून सलामी दिली जात होती. या सलामी दरम्यान एका पोलीस कर्मचाऱ्याच्या बंदुकीतून मिसफायर झालं. ज्या ठिकाणी हा प्रकार घडला, तिथून काही अंतरावरच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. इतकंच नाही तर पार्थ पवार आणि काही जण अजित पवार यांच्या पार्थिवाजवळ थांबले होते. मोठा अनर्थ घडला असता मात्र सुदैवानं मिसफायर झालेली गोळी कुणाला लागली नाही. या घटनेने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नेमकं काय घडलं?
अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी पार्थिव चितेवर ठेवण्यात आलं. नियमाप्रमाणे पोलिसांकडून शासकीय मानवंदना आणि हवेत तीन राऊंड फायर करून सलामी देण्याची प्रक्रिया सुरू होती. पहिल्या राऊंडचा फायर व्यवस्थित झाला. मात्र, दुसरा राऊंड फायर करताना पहिल्या रांगेतील एका पोलिसाची बंदूक अडकली आणि त्यातून चुकीच्या दिशेने 'मिसफायर' झालं.
अमित शाह अन् मुख्यमंत्र्यांपासून हाकेच्या अंतरावर घटना
हा प्रकार घडला तेव्हा समोरच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शरद पवार आणि राज्य मंत्रिमंडळातील दिग्गज नेते उपस्थित होते. अजित पवार यांचे पुत्र पार्थ आणि जय पवार हे पार्थिवाला मुखाग्नी देत असतानाच हा प्रकार घडला. सुदैवाने, बंदुकीतून सुटलेली गोळी कोणालाही लागली नाही आणि मोठा अनर्थ टळला. मात्र, अशा अत्यंत संवेदनशील प्रसंगी झालेल्या या चुकीमुळे अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
advertisement
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आहे. त्यामध्ये स्पष्टपणे दिसते की, बंदूक चालवताना पोलीस कर्मचाऱ्याचा ताबा सुटला आणि गोळी भलतीकडेच फायर झाली. या घटनेनंतर काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. सुरक्षेतील ही गंभीर चूक मानली जात असून, संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर किंवा तुकडीवर काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
Location :
Baramati,Pune,Maharashtra
First Published :
Jan 30, 2026 2:15 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अमित शाह यांच्यासमोरच पोलीस कर्मचाऱ्याकडून मिसफायर, अजितदादांच्या अंत्यसंस्कारावेळी घडला प्रकार, VIDEO









