शरद पवारांचे उमेदवार घड्याळावर लढण्याच्या चर्चा, प्रशांत जगताप यांनी ठणकावलं, माझा पक्ष...
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाच्या हालचाली सुरू असताना प्रशांत जगताप यांनी मात्र विरोधाची भूमिका घेतली आहे.
अभिजीत पोते, प्रतिनिधी, पुणे: पुण्यात भारतीय जनता पक्षाला टक्कर देण्यासाठी शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोबत घेण्याचे प्रयत्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुरू आहेत. दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र येऊन भारतीय जनता पक्षासोबत मुकाबला केला पाहिजे तर पुणे महापालिकेचा किल्ला पुन्हा मिळविणे सोपे जाईल, असा मतप्रवाह राष्ट्रवादीमधील नेत्यांचा असल्याचे कळते. दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाच्या चर्चा ऐकल्यानंतर थेट राजकीय निवृत्तीची घेईल, असे धाडसी विधान करणारे माजी महापौर प्रशांत जगताप यांनी सोमवारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेऊन निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा केली.
महापालिका निवडणूक तोंडावर असताना अजित पवार यांचे जवळपास डझनभर मोहरे भाजपने आपल्याकडे खेचले. भारतीय जनता पक्षाच्या फोडाफोडीच्या कृत्यावर अजित पवार यांनी संताप व्यक्त करीत इतर पक्षांना सोबत घेऊन भाजपविरोधात मोट बांधण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेससोबत अजित पवार यांनी बोलणी सुरू केली आहे. ज्येष्ठ नेते, माजी मंत्री राजेश टोपे यांच्याशी अजित पवार यांनी फोनवरून चर्चा केल्याचे कळते. जयंत पाटील, शशिकांत शिंदे आदी नेत्यांमध्ये चर्चा सुरू असल्याचे कळते. एकत्रिकरणाच्या हालचाली सुरू असताना प्रशांत जगताप यांनी मात्र विरोधाची भूमिका घेतली आहे. त्याचवेळी पवारसाहेब सांगतील तेच करू, असेही ते म्हणाले.
advertisement
आमचे कुणीही उमेदवार घड्याळावर लढणार नाही, प्रशांत जगताप यांच्याकडून स्पष्ट
पुण्यात राष्ट्रवादी एकत्र लढणार या चर्चा आहेत. याबाबत मला काही कल्पना नाही. आज बाकीचे लोक चर्चा करण्यासाठी आले होते. मी प्रचार आणि जाहीरनामा दाखविण्यासाठी शरद पवार यांच्याकडे आलो होतो. माझा पक्ष हा शरद पवार यांचा पक्ष आहे. आम्ही जिथेही लढू तिथे 'तुतारी हातात घेतलेला माणूस' म्हणूनच आम्ही लढू, असे स्पष्टपणे सांगत आमचे कुणीही उमेदवार घड्याळावर लढणार नसल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले.
advertisement
शेवटचा निर्णय शरद पवार घेतील
अजित पवार हे राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत चर्चा करीत असल्याच्या वृत्तावर विचारले असता, अजित दादा हे उपमुख्यमंत्री आहेत ते कोणत्याही नेत्यांशी चर्चा करू शकतात. महाराष्ट्रात चुकीची राजकीय संस्कृती नाही. याबाबत शेवटचा निर्णय शरद पवार साहेब घेतील, असे जगताप म्हणाले.
भाजपवर शरसंधान
भाजपवाले उद्या दहशतवादी, तुरूंगात असलेल्या माणसाला सुद्धा आपल्या पक्षात घेतील. हे होलसेल रेटने सगळ्यांना घेत आहेत. याचा विचार आमच्या पक्षांनी करायला हवा आणि मतदारांनी सुद्धा विचार करायला पाहिजे, अशा शब्दात जगताप यांनी शरसंधान साधले.
advertisement
काँग्रेसला नजरेआड करून चालणार नाही
काँग्रेसला नजरेआड करून चालणार नाही. कोणत्याही स्वरुपाचे पाठबळ नसताना त्यांनी अजित पवार यांच्या पक्षा इतक्या जागा मिळवल्या. त्यामुळे त्यांना दुर्लक्षित करून चालणार नाही, असेही त्यांनी अधोरेखित केले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 22, 2025 4:13 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शरद पवारांचे उमेदवार घड्याळावर लढण्याच्या चर्चा, प्रशांत जगताप यांनी ठणकावलं, माझा पक्ष...










