जिथे केला माज, तिथेच काढली लाज... घायवळ गँगमधल्या आरोपींची पुणे पोलिसांनी धिंड काढली
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Nilesh Ghaywal Gang: शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पुणे पोलिसांनी घायवळ गँगच्या सात आरोपींना गोळीबाराच्या ठिकाणी आणून त्यांची परिसरात धिंड काढली.
अभिजीत पोते, प्रतिनिधी, पुणे : पुणे शहरातील कोथरूड भागात गुंड निलेश घायवळ टोळीतील पाच आरोपींनी एका तरुणावर गोळीबार केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी निलेश घायवळसह ६ जणांवर गुन्हा दाखल केला असून, त्याच्या टोळीवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. अटकेच्या भीतीने निलेश घायवळ जरी फरार झाला असला तरी त्याच्या टोळीतील इतर आरोपींना पोलिसांनी धडा शिकवला. ज्या परिसरात आरोपींनी गोळीबार केला तिथेच पोलिसांनी त्यांची धिंड काढली.
गुंड निलेश घायवळ टोळीने कोथरुडमध्ये केलेल्या गोळीबार आणि कोयता हल्ला प्रकरणी पुणे पोलिसांनी निलेश घायवळसह ६ जणांवर गुन्हा दाखल आहे. या प्रकरणातील इतर आरोपी अटकेत असताना निलेश घायवळ लंडनला फरार झाला असल्याची माहिती समोर येत आहे. शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी सात आरोपींना गोळीबाराच्या ठिकाणी आणून त्यांची परिसरात धिंड काढली.
advertisement
निलेश घायवळच्या घराची झाडाझडती
पुणे पोलिसांनी निलेश घायवळच्या एकूण तीन गाड्या जप्त केल्या. घायवळच्या मालकीची एक स्कॉर्पिओ आणि दोन दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या. तसेच पोलिसांनी निलेश घायवळ याच्या घराची झाडाझडती घेतली.
निलेश घायवळविरोधात लूक आऊट नोटीस जारी, भारतात येताच अटक करणार-पोलीस
निलेश घायवळ हा पुण्यातील मोठा गुंड आहे. हत्येचा प्रयत्न , खंडणी , अपहरण, हाणामारी यासारखे गंभीर गुन्हे त्याच्या नावावर आहेत. किंबहुना 'मकोका'सारखा गंभीर गुन्हाही त्याच्या नावावर आहे. असे गंभीर गुन्हे नावावर असलेल्या संबंधित आरोपी तसेच नामचिन गुन्हेगाराचा पासपोर्ट पोलीस जप्त करतात. मात्र घायवळ प्रकरणात पोलिसांनी पासपोर्ट जप्त का केला नाही, असा प्रश्न विचारला जात आहे.
advertisement
निलेश घायवळने पासपोर्ट आपल्याकडे जमाच केला नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे. निलेश घायवळ याच्याबाबत लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली असून भारतात परत येताच त्याला अटक करण्यात येईल, असे स्पष्टीकरण पुणे पोलिसांनी दिले आहे.
गुन्हेगारी कृत्यांमधून अमाप संपत्ती जमवली, लंडनमध्ये घर घेतले
निलेश घायवळने गुन्हेगारी कृत्यांमधून खूप मोठ्या प्रमाणात पैसा कमावला असून त्यातून त्याने लंडनमध्ये घर घेतले आहे. तसेच त्याचा मुलगा लंडनमध्ये शिक्षण घेत असल्याचे देखील पोलिसांनी सांगितले.
advertisement
निलेश घायवळ कोण आहे?
निलेश घायवळ हा एक गुन्हेगारांच्या टोळीचा प्रमुख असून त्याच्यावर अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. निलेश घायवळ हा मूळचा अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेडच्या सोनेगावचा आहे. पुण्यातील कुख्यात गुंड म्हणून ओळखला जातो. निलेश घायवळची पुण्यात मोठी दहशत आहे. निलेश घायवळ हा जामखेडवरून पुण्यात शिक्षण घेण्यासाठी आला. मात्र पुण्यात आल्यावर त्याने गुन्हेगारी जगतात प्रवेश केला. गजा मारणे टोळीशी निलेश घायवळ याचा संबंध आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 26, 2025 10:17 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
जिथे केला माज, तिथेच काढली लाज... घायवळ गँगमधल्या आरोपींची पुणे पोलिसांनी धिंड काढली