उदाच्यावाडीत तुमची १२० एकर जमीन, सुळेंसमोरच गावकऱ्यांचा आरोप, सुप्रिया म्हणाल्या...
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Supriya Sule Visit Purandar Airport Protest: पोलिसांनी बळाचा वापर करून शेतकऱ्यांचे आंदोलन कसे चिरडून टाकले, याचे कथन शेकडो शेतकऱ्यांनी सुप्रिया सुळे यांच्यासमोर केले.
वैभव सोनवणे, पुरंदर, पुणे : पुरंदर तालुक्यात प्रस्तावित असलेल्या विमानतळासाठी तेथील जमिनींचा सरकारकडून सर्व्हे होत आहे. मात्र, या सर्व्हेला बाधित गावातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. यादरम्यान पोलीस आणि गावकऱ्यांमध्ये संघर्ष झाला. यावेळी पोलिसांनी लाठीहल्ला केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. तेथील एका महिलेचाही यात मृत्यू झाल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. सोमवारी बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुरंदरच्या कुंभारवळणला जाऊन तेथील नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले.
पोलिसांनी बळाचा वापर करून शेतकऱ्यांचे आंदोलन कसे चिरडून टाकले, याचे कथन शेकडो शेतकऱ्यांनी सुप्रिया सुळे यांच्यासमोर केले. पोलिसांनी लाठीहल्ला केल्याने अनेक शेतकरी जमखी झाले आहेत. पोलिसांनी मारल्याने अंगावर उमटलेले व्रण शेतकऱ्यांनी सुप्रिया सुळे यांना दाखवले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे जाऊन मी संबंधित पोलिसांची चौकशीची मागणी करणार आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
advertisement
उदाच्यावाडीत तुमची १२० एकर जमीन, सुळेंसमोरच गावकऱ्यांचा आरोप
तत्पूर्वी पुरंदरच्या विमानतळ भूसंपादन विरोधी मेळाव्यात शेतकऱ्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर त्यांच्यासमोरच आरोप केला. उदाच्यावाडीत सुप्रिया सुळे यांची १२० एकर जमीन असल्याची चर्चा आहे, असे गावकरी म्हणाले. त्यावर माझी जमीन असल्याचे पुरावे दाखवे, असे ओपन चॅलेंज सुप्रिया सुळे यांनी दिले. नाव असल्याचे दाखवले तर कोऱ्या कागदावर सही द्यायची तयारी आहे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
advertisement
पोलिसांच्या लाठीहल्ल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांचे ट्विट
बारामती लोकसभा मतदार संघातील पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण येथे झालेला प्रकार अतिशय दुर्दैवी आहे. शासनाने नागरीकांच्या भावना समजावून घेऊन योग्य ती पावले उचलणे आवश्यक होते. परंतु तेथे बळाचा वापर करण्यात आला ही बाब निश्चितच अतिशय दुःखद आहे. या घटनेत येथील नागरीक जखमी झाले ही बाब अतिशय वेदनादायी आणि अस्वस्थ करणारी आहे. शासनाने जनतेच्या भावना लक्षात घेऊन संयम व संवेदनशीलता दाखविणे आवश्यक होते. आम्ही सर्वजण या घटनेचा निषेध करतो. शासनाला आवाहन आहे की कृपया आपण हा विषय संवेदनशीलतेने हाताळावा.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
May 05, 2025 10:12 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
उदाच्यावाडीत तुमची १२० एकर जमीन, सुळेंसमोरच गावकऱ्यांचा आरोप, सुप्रिया म्हणाल्या...