Maharashtra Oppose Hindi Imposition : हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधू मैदानात, पण मराठी माणूस गोंधळात! मोर्चे दोन, उद्दिष्ट एकच!
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Maharashtra Oppose Hindi Imposition : हिंदी सक्तीविरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे आंदोलनाच्या मैदानात उतरले आहेत. ठाकरे बंधूंनी आंदोलनाचा पवित्रा घेतला असला तरी मराठी माणसाला पुन्हा एकदा फाटाफूट होणार का, याची चिंता सतावू लागली आहे.
मुंबई : राज्यातील शालेय शिक्षणात तिसऱ्या भाषेच्या रूपात हिंदीचा समावेश करण्याच्या प्रस्तावावरून सध्या तीव्र राजकीय घडामोडी सुरू आहेत. हिंदी सक्तीविरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे आंदोलनाच्या मैदानात उतरले आहेत. ठाकरे बंधूंनी आंदोलनाचा पवित्रा घेतला असला तरी मराठी माणसाला पुन्हा एकदा फाटाफूट होणार का, याची चिंता सतावू लागली आहे. राज ठाकरे यांनी 6 जुलै रोजी मोर्चाचे आयोजन केले आहे. तर, दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी 7 जुलै रोजी होणाऱ्या आंदोलनाला पाठिंबा देत त्यात सहभागी होणार असल्याचे सांगितले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 6 जुलै रोजी मुंबईत मोर्चाची हाक दिली आहे. या मोर्चात कोणत्याही पक्षाचा झेंडा नसणार, मराठी माणूस या आंदोलनाचे नेतृत्व करणार असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले. तर, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील मराठी अभ्यास केंद्राच्या नेतृत्वात होणाऱ्या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे जाहीर केले आहे. मराठीच्या मुद्यावर ठाकरे बंधूंमध्ये एकमत झाले असले तरी आंदोलनाच्या वाटा वेगळ्या दिसत असल्याचे चित्र आहे.
advertisement
मराठी अभ्यास केंद्राकडून मोर्चाची आधी घोषणा...
मराठी अभ्यास केंद्राच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या त्रिभाषा सूत्र विरोधी समन्वय समितीच्यावतीने 7 जुलै रोजी आझाद मैदानावर मोर्चा काढण्यात येणार आहे. त्या मोर्चाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. हुतात्मा चौकातून हुतात्म्यांना अभिवादन करून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. त्रिभाषा सूत्र विरोधी समन्वय समितीने काही दिवसांपूर्वीच आपल्या आंदोलनाची रुपरेषा जाहीर केली होती. त्यामध्ये मोर्चा काढणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्रिभाषा सूत्र विरोधी समन्वय समितीकडून विविध राजकीय पक्षाच्या नेत्याच्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत. बुधवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची भेट घेण्यात आली होती. तर, आज शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यात आली. त्यानंतर विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे समितीने जाहीर केले. 7 जुलैपासून राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे.
advertisement
मनसेकडूनही मोर्चाची घोषणा
राज ठाकरे यांनी 6 जुलै रोजी गिरगाव चौपाटीवरून मराठी भाषेसाठी मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले. हा मोर्चा मराठी माणसाचा असणार आहे. या मोर्चाला कोणताही नेता नसणार, कोणत्याही राजकीय पक्षाचे झेंडे नसणार. मराठी माणूसच या आंदोलनाचे नेतृत्व करणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. या आंदोलनात विद्यार्थी, पालक यांच्यासह मराठी माणसाला मोठ्या संख्येने सहभागी होता यावे, यासाठी रविवारचा दिवस निवडला असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. सगळ्याच राजकीय पक्षांना या मोर्चात सहभागी होण्यासाठी संपर्क साधला जाणार असल्याचे राज यांनी सांगितले.
advertisement
मुद्दा एक, मोर्चे दोन?
एकाच महत्त्वाच्या मुद्यावर दोन मोर्चांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे आता मराठी वाचवण्याच्या लढ्यात मराठी माणसात फाटाफूट होणार का, याची चर्चा सुरू झाली आहे. 7 जुलैच्या मोर्चात उद्धव ठाकरे सहभागी होणार असल्याने ठाकरे गटाचे महत्त्वाचे नेते, शिवसैनिक या मोर्चात सहभागी होण्याची शक्यता आहे. तर, त्रिभाषा सूत्र विरोधी समन्वय समितीकडूनही विविध संघटना, संस्था, पक्ष यांना
advertisement
आवाहन करण्यात आले आहे.
तर, राज ठाकरे यांनी मोर्चा जाहीर केल्याने त्याला राजकीय रंग अधिक येण्याची शक्यता आहे. मोर्चात झेंडे नसणार अशी भूमिका राज यांनी स्पष्ट केली असली तरी मनसेकडून शक्ति प्रदर्शन होणार असल्याचे म्हटले जात आहे. राज यांनी सगळ्या राजकीय पक्षांना संपर्क साधला जाणार असल्याचे म्हटले असले तरी कोणत्या पक्षांना संपर्क साधला जाईल, याबाबत स्पष्टता नाही. उद्धव ठाकरेंबाबत विचारले असता राज यांनी महाराष्ट्रापेक्षा कोणी मोठा नाही असे म्हटले होते, त्याची प्रचिती 6 जुलैला येणार असल्याचे सांगितले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 26, 2025 3:00 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Oppose Hindi Imposition : हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधू मैदानात, पण मराठी माणूस गोंधळात! मोर्चे दोन, उद्दिष्ट एकच!