Raj Thackeray : मनं जुळली पण राजकीय गणित जुळेना? युतीबाबत राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश, 'मला...'
- Published by:Shrikant Bhosale
- Reported by:UDAY JADHAV
Last Updated:
Raj Thackeray : मराठीच्या निमित्ताने मनं जुळली पण युतीसाठीचे राजकीय गणित जुळत नसल्याची चर्चा आहे. राज ठाकरे यांनी पदाधिकार्यांना युतीबाबत भाष्य न करण्याचे आदेश दिले आहेत.
मुंबई: शनिवारी पार पडलेल्या मराठी विजय मेळाव्यात उद्धव आणि राज ठाकरे हे जवळपास 20 वर्षानंतर एकाच राजकीय विचारमंचावर एकत्र दिसले. ठाकरे बंधू एकत्र आल्याने शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या युतीची चर्चा सुरू झाली. उद्धव ठाकरे यांनी तसे संकेतही दिले. मात्र, आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून सावध भूमिका घेतली जात असल्याचे म्हटले जात आहे. मराठीच्या निमित्ताने मनं जुळली पण युतीसाठीचे राजकीय गणित जुळत नसल्याची चर्चा आहे. राज ठाकरे यांनी पदाधिकार्यांना युतीबाबत भाष्य न करण्याचे आदेश दिले आहेत.
काही दिवसांपूर्वी वरळीतील एनएससीआय डोममध्ये झालेल्या संयुक्त मराठी जल्लोष मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघेही एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते. या ऐतिहासिक भेटीनंतर राजकीय वर्तुळात दोन्ही पक्षांमध्ये युती होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात चर्चेत आली होती.
राज ठाकरेंचे आदेश काय?
शिवसेना (ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) संभाव्य युतीच्या चर्चेला सध्या राज्याच्या राजकारणात जोर आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना 'मौन राखा' असा स्पष्ट आदेश दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कोणत्याही पदाधिकाऱ्याने युती संदर्भात कोणतंही वक्तव्य करायचं झाल्यास आधी माझी परवानगी घ्या, असे निर्देश त्यांनी दिले असल्याची माहिती समोर आली आहे. या आदेशामुळे ठाकरे-मनसे युतीच्या चर्चेबाबत आता अधिकच गूढ वाढले आहे.
advertisement
युतीचा सस्पेन्स वाढला...
राज ठाकरे यांच्या नव्या सूचनेमुळे या चर्चांवर मर्यादा येणार असून, पक्षांतर्गत रणनीती अंतिम होईपर्यंत कोणतीही अधिकृत माहिती बाहेर येणार नाही, हे स्पष्ट झालं आहे. यामुळे कार्यकर्त्यांपासून ते राजकीय निरीक्षकांपर्यंत सगळ्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
राज ठाकरे यांनी संवादावर घातलेली मर्यादा ही युतीविषयी सुरू असलेल्या राजकीय चर्चांना सध्या ‘पॉज’वर टाकल्याचे चित्र आहे. तर, दुसरीकडे ठाकरे गटाने युतीबाबत आपण अद्यापही सकारात्मक असल्याची भूमिका मांडली आहे. राजकीय समीकरणांची गणितं जुळवताना दोन्ही पक्ष कोणती दिशा घेतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 07, 2025 10:32 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Raj Thackeray : मनं जुळली पण राजकीय गणित जुळेना? युतीबाबत राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश, 'मला...'