Sangli News : 'अमृताला सोडून दे, तुझं जातीतील मुलीशी लग्न लावू', 2 लाख रुपये हुंड्याची मागणी अन् नवविवाहितेने संपवलं आयुष्य!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Sangli domestic abuse Case : हुंडाबळीच्या प्रकरणी अमृताला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल तिचा पती आणि सासरच्या लोकांसह एकूण पाच जणांवर इस्लामपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Sangli Crime News : सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सांगलीत सासरच्या छळाला कंटाळून दोन महिन्याच्या नवविवाहितेने स्वत:ला संपवल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे तिचं लव मॅरेज झालं होतं. सासूच्या औषधोपचारासाठी माहेरहून 2 लाख रुपये आणण्यासाठी नवविवाहिता अमृता ऋषिकेश गुरव हिचा छळ करण्यात येत होता. या अमानुष त्रासाला कंटाळून तिने शुक्रवारी विषारी द्रव प्राशन केले आणि रविवार, दिनांक 5 रोजी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
प्रेमविवाह अन् नवऱ्याने साथ सोडली
हुंडाबळीच्या या प्रकरणी अमृताला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल तिचा पती आणि सासरच्या लोकांसह एकूण पाच जणांवर इस्लामपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमृताची आई वंदना कोले यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक 26 डिसेंबर 2024 रोजी अमृता आणि पती ऋषिकेश अनिल गुरव यांचा प्रेमविवाह झाला होता. मात्र, लग्नानंतर काही महिन्यांतच पती ऋषिकेश आणि सासरचे लोक सासू अनुपमा यांच्या आजारपणाचा खर्च भागवण्यासाठी अमृताकडे माहेरहून 2 लाख रुपये आणण्याची मागणी करत तिचा तगादा लावत होते.
advertisement
तू अमृताला सोड, तुझं जातीतील मुलीशी...
सासरकडून होणाऱ्या या मागणीसाठी तिला वारंवार मारहाण करून मानसिक त्रास दिला जात होता. पती ऋषिकेशकडून शारीरिक मारहाण होत असे, तर सासू अनुपमा आणि नणंद ऋतुजा या दोघी तिचा सतत अपमान करत होत्या. इतकेच नव्हे तर, मामा नंदकिशोर पांडुरंग गुरव (रा. वडणगे, जि. कोल्हापूर) हा पती ऋषिकेशला 'तू अमृताला सोडून दे, मी तुझं आपल्याच जातीतील मुलीशी लग्न लावून देतो,' असे सांगून अमृताचा मानसिक छळ करत होता.
advertisement
रविवारी उपचारादरम्यान मृत्यू
दरम्यान, प्रकार लक्षात येताच तिला तातडीने इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती खालावल्यामुळे तिला कोल्हापूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले, जिथे रविवारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तिच्या आई-वडिलांनी रुग्णालयात धाव घेतली असता, तिने घडलेला सर्व प्रकार त्यांच्यासमोर सांगितला होता. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पती ऋषिकेश अनिल गुरव, सासू अनुपमा अनिल गुरव, सासरा अनिल मधुकर गुरव, नणंद ऋतुजा अनिल गुरव आणि मामा नंदकिशोर पांडुरंग गुरव यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
view commentsLocation :
Sangli,Maharashtra
First Published :
Oct 07, 2025 10:58 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सांगली/
Sangli News : 'अमृताला सोडून दे, तुझं जातीतील मुलीशी लग्न लावू', 2 लाख रुपये हुंड्याची मागणी अन् नवविवाहितेने संपवलं आयुष्य!











