आनंद दिघेंबाबतच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद, संजय राऊतांना घरात घुसून मारण्याचा इशारा
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Sanjay Raut: संजय राऊतांनी आनंद दिघे यांच्याविषयी केलेल्या विधानाने वादंग पेटला.
मुंबई : ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्याविषयी केलेल्या टिपण्णीचे मोठे पडसाद उमटले. ठाणे आणि परिसरात राऊतांचा निषेध नोंदवत आंदोलनं झाली. तर शिंदेंच्या खासदार आमदारांनी राऊतांना थेट घरात घुसून मारण्याचा इशारा दिला. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून राऊतांनी आपल्या विधानावर सारवासारव केली. पण या घटनेच्या निमित्ताने नेत्यांची घसरलेली भाषा पुन्हा एकदा अधोरेखित झाली.
संजय राऊतांनी आनंद दिघे यांच्याविषयी केलेल्या विधानाने वादंग पेटला. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदेंनी सर्व प्रमुख वर्तमानपत्रात शुभेच्छांच्या जाहिराती दिल्या. या जाहिरातीतल्य़ा एका फोटोवर संजय राऊतांनी नाराजी व्यक्त केली. हा फोटो होता शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघेंचा. बाळासाहेब ठाकरेंच्या बरोबरीने त्यांच्या फोटाला स्थान दिल्याने राऊतांनी शिंदेंवर तोफ डागली.
राऊतांनी आनंद दिघेंबद्दल केलेल्या विधानावरुन शिंदेंची सेना संतप्त झाली. राऊतांचं हे विधान खोडून काढताना शिंदेंच्या खासदारांनी राऊतांवर शेलक्या भाषेत टीका केली. आनंद दिघे हे उपमुख्यमंत्री शिंदेंचे राजकीय गुरु. त्यामुळे आनंद दिघेंविषयीच्या वक्तव्यानंतर शिंदेंचे सैनिक पेटून उठलेत. कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी तर संजय राऊतांना थेट धमकीचं दिलीय. संजय राऊतांनी अशीच वक्तव्ये केली तर त्यांना घरात घुसून मारू, असे राजेश मोरे म्हणाले.
advertisement
आपल्या विधानावरुन राजकीय वाद वाढत असल्याचं लक्षात येताच संजय राऊतांनी आपल्या ओरिजिनल वक्तव्यावरुन सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय. गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातल्या राजकारणाची आणि भाषेची पातळी घसरल्याची टीका सातत्याने होते. अशा परिस्थितीत कोणतीही राजकीय टिपण्णी किंवा विधान करताना काळजी घेणं ही सर्वपक्षीयांची जबाबदारी आहे. त्यामुळे आगामी काळात राजकीय पटलावर जबाबदारीने नेते असे वाद टाळतील अशी अपेक्षा.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Sep 19, 2025 10:03 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आनंद दिघेंबाबतच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद, संजय राऊतांना घरात घुसून मारण्याचा इशारा









