BJP : थोरल्या पवारांनी ज्यांच्यावर विश्वास टाकला, तेच आता कमळ हाती धरणार, हिरेंनंतर आणखी एकजण भाजपात
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Maharashtra Politics :स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राज्यातही दणदणीत यश मिळवण्यासाठी सत्ताधारी पक्षाकडून जोरदार हालचाली सुरू आहेत. त्यातूनच आता अनेक स्थानिक नेत्यांसह बड्या नेत्यांना पक्षात प्रवेश दिला जात आहे.
लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी, नाशिक: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षात जोरदार इनकमिंग सुरू असल्याचे चित्र आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राज्यातही दणदणीत यश मिळवण्यासाठी सत्ताधारी पक्षाकडून जोरदार हालचाली सुरू आहेत. त्यातूनच आता अनेक स्थानिक नेत्यांसह बड्या नेत्यांना पक्षात प्रवेश दिला जात आहे. भाजपातही मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू असून आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचा आणखी नेता भाजपात प्रवेश करणार आहे.
धुळे जिल्ह्याचे माजी आमदार आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते कुणाल पाटील आणि नाशिकचे माजी आमदार अपूर्व हिरे भाजपात प्रवेश करणार असताना आता उत्तर महाराष्ट्रातील आणखी एक नेता भाजपात प्रवेश करत 'घरवापसी' करणार आहे.
नाशिकच्या राजकारणात मोठी घडामोड घडण्याची चिन्हं आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवलेले गणेश गीते हे पुन्हा एकदा भाजपाच्या वाटेवर असल्याची माहिती पुढे आली आहे. येत्या दोन दिवसांत गीते आणि त्यांच्या समर्थक माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश निश्चित असल्याचे सांगितले जात आहे.
advertisement
गणेश गीते यांनी मागील विधानसभा निवडणुकीत भाजप सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. नाशिक पूर्व मतदारसंघातून भाजपचे विद्यमान आमदार राहुल ढिकले यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत गीते यांना पराभव पत्करावा लागला, मात्र त्यांनी मतदारसंघात मोठा जनसंपर्क टिकवून ठेवला आहे.
सध्या गीते हे भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांच्या भाजपात पुनःप्रवेशाच्या चर्चांना जोर मिळाला आहे. त्यांच्या या हालचालीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) जिल्हा संघटनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
advertisement
दरम्यान, गीते यांच्यासोबत काही माजी नगरसेवक देखील भाजपात प्रवेश करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. येत्या दोन दिवसांत हा प्रवेश सोहळा होण्याची शक्यता आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून मोठ्या प्रमाणावर पक्ष प्रवेश केले जात आहेत.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
July 01, 2025 9:52 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BJP : थोरल्या पवारांनी ज्यांच्यावर विश्वास टाकला, तेच आता कमळ हाती धरणार, हिरेंनंतर आणखी एकजण भाजपात