Sharad Pawar : आधी सुप्रियाला अधिकार अन् आता नकार! राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर पवारांची गुगली
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Sharad Pawar On NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुप्रिया सुळे आणि इतर नेते निर्णय घेतील, आपण त्यात नसणार असे शरद पवार यांनी अनौपचारिक भाष्य केले होते. त्यानंतर आता शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर भाष्य करताना महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
पिंपरी-चिंचवड: राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या विलीनीकरणाच्या मुद्यावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पु्न्हा एकदा गुगली टाकली आहे. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुप्रिया सुळे आणि इतर नेते निर्णय घेतील, आपण त्यात नसणार असे शरद पवार यांनी अनौपचारिक भाष्य केले होते. त्यानंतर आता शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर भाष्य करताना महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
पिंपरी-चिंचवड येथे पक्षाच्या कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले. पवार यांनी संधीसाधूपणाचं राजकारण करू नका असे आवाहन केले. त्याच वेळी मात्र त्यांनी सगळे बरोबर घेता येतील. पण सत्तेसाठी भाजप बरोबर जाणाऱ्यांची साथ नको असे स्पष्ट वक्तव्य केले. पवारांच्या वक्तव्याने आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता धूसर झाली असल्याची माहिती समोर आली आहे. कोणासोबतही संबंध ठेवा, पण भाजपसोबत संबंध ठेवू नका, अशी स्पष्ट भूमिका शरद पवार यांनी घेतली. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा थंड बस्तानात गेली असल्याचे म्हटले जात आहे.
advertisement
शरद पवार यांनी आपल्या भाषणात आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबतही भाष्य केले. आगामी पालिका निवडणुकीसाठी नव्या नेतृत्वाची फळी निर्माण करावी लागणार आहे. या नव्या फळीच्या मार्फत आपल्याला बदल घडवावा लागणार असल्याचे म्हटले. भावी पिढीने प्रेरणा घ्यायला हवी असा विकास करायचा आहे, यासाठी संघटन मजबूत करावी लागेल. जे गेले त्यांची चिंता करू नका असे पवार यांनी यावेळी म्हटले.
advertisement
माझ्यासोबतच्या अनेक सहकाऱ्यांनी साथ सोडली, पण ज्या-ज्यावेळी असं घडलं, तेव्हा मी चिंताग्रस्त झालो नाही. मला कार्यकर्त्यांनी खंबीर साथ दिली आणि जनतेने पाठिंबा दिला. त्यानंतरही मी सत्तेत आलेलो आहे. त्यामुळे कोण आला, कोण गेला याची चिंता करु नका. लोक शहाणे आहेत, आज ही लोकशाही जनतेच्या शहाणपणाने टिकलेली आहे. ती यापुढं ही टिकून राहणार असल्याचा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.
advertisement
गांधी-नेहरू यांचे विचार महत्त्वाचे...
शरद पवार यांनी पिंपरी-चिंचवडच्या विकासाबाबत भाष्य केले. त्यांनी आपल्या भाषणात म्हटले की, चाकण, बारामती, इंदापूर, अशा अनेक ठिकाणी औद्योगिक पट्टा निर्माण केला. पिंपरी चिंचवडच्या आजूबाजूला हे औद्योगिक आणण्यासासाठी आम्ही झटलो. आज स्थिती वेगळी असून इथलं राजकारण, समाजकारण बदललं असल्याकडे पवार यांनी लक्ष वेधले. इथलं नेतृत्व अण्णासाहेब मगर, मग आम्ही, त्यानंतर रामकृष्ण मोरे यांनी या शहराचा चेहरा बदलण्यासाठी कष्ट घेतले. यामागे गांधी-नेहरूंचे विचार महत्वाचे ठरले. त्यांनी विकासाची गंगा आणली अन हीच विकासाची गाडी आपल्याला पुढं न्यायची असल्याचे शरद पवार यांनी म्हटले.
Location :
Pimpri Chinchwad,Pune,Maharashtra
First Published :
June 17, 2025 2:15 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sharad Pawar : आधी सुप्रियाला अधिकार अन् आता नकार! राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर पवारांची गुगली