Nashik News : राहुल गांधींकडून 'मतचोरी'चा आरोप, महाराष्ट्रात समोर आलं कांड, महापालिका निवडणुकीआधी खळबळ
- Published by:Shrikant Bhosale
- Reported by:Laxman Ghatol
Last Updated:
Election Commission : मोठ्या प्रमाणावरील बोगस मतदारांवरून राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला. त्यानंतर आता राज्यातील आगामी महापालिका निवडणुकीआधी मोठं कांड समोर आलं आहे. यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.
नाशिक: काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुकीतील मोठ्या प्रमाणावरील बोगस मतदारांवरून राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला. त्यानंतर आता राज्यातील आगामी महापालिका निवडणुकीआधी मोठं कांड समोर आलं आहे. यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.
विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी आपल्या पत्रकार परिषदेत धक्कादायक आरोप केले होते. कर्नाटकातील बेंगुळुरूमधील एका विधानसभा मतदारसंघात जवळपास एक लाख मतदारांवर राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केले होते. यामध्ये दुबार मतदारांसह एकाच पत्त्यावर 80 मतदारांचा पत्ता असल्याचे त्यांनी दाखवले. असे प्रकार आणखी काही बुथवर झाल्याचे गांधी यांनी म्हटले होते. त्यांच्या या आरोपानंतर देशातील राजकारण तापलं आहे.
advertisement
महाराष्ट्रातही कांड समोर...
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये अनेक बनावट मतदार ओळखपत्रे आढळल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी योगेश गांगुर्डे यांनी हा भंडाफोड केला असून, यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
एकच व्यक्ती, तीन नावं...
गांगुर्डे यांच्या म्हणण्यानुसार, एका व्यक्तीच्या नावावर तब्बल तीन वेगवेगळे मतदार ओळखपत्र निघाले आहेत. काही प्रकरणांत एकाच व्यक्तीचा फोटो असूनही त्यावर वेगवेगळी नावे छापण्यात आली आहेत. एवढेच नव्हे, तर एका ओळखपत्रावर नाव महिलेचे असताना त्यावरचा फोटो पुरुषाचा असल्याचा प्रकारही समोर आला आहे.
advertisement
अशा प्रकारे अनेक बनावट व विसंगत ओळखपत्रांचे वितरण झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. हे पुरावे लवकरच निवडणूक आयोगाकडे सादर केले जाणार असल्याची माहिती गांगुर्डे यांनी दिली. त्यांनी संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून अशा बनावट कार्ड तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि प्रामाणिकपणासाठी अशा प्रकारच्या फसवणुकीवर कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याचे गांगुर्डे यांनी स्पष्ट केले. या प्रकरणामुळे नाशिक जिल्ह्यात राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली असून, नागरिकांमध्येही चिंता वाढली आहे.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
August 13, 2025 11:21 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nashik News : राहुल गांधींकडून 'मतचोरी'चा आरोप, महाराष्ट्रात समोर आलं कांड, महापालिका निवडणुकीआधी खळबळ