सोलापूरकरांसाठी महत्त्वाची बातमी, एका वर्षासाठी बंद राहणार हा रस्ता, पर्यायी मार्ग कोणते?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
उड्डाणपूल धोकादायक बनल्याने पाडण्यात येणार असल्याने हा मार्ग रहदारीसाठी एक वर्षासाठी बंद करण्यात येणार आहे.
सोलापूर : सोलापूर शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक ते मरीआई चौक दरम्यान असलेला रेल्वे मार्गांवरील उड्डाणपूल धोकादायक बनल्याने पाडण्यात येणार असल्याने हा मार्ग रहदारीसाठी एक वर्षासाठी बंद करण्यात येणार आहे. 9 डिसेंबर 2025 च्या मध्यरात्रीपासून 8 डिसेंबर 2026 पर्यंत हा रस्ता बंद करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी काढले आहेत.
सोलापूर शहराच्या विकासाचा साक्षीदार असणारा 1922 मध्ये बांधण्यात आलेल्या पुलाला 103 वर्षे पूर्ण झाले आहेत. हा पूल धोकादायक बनल्याने हा पूल पाडण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गांवरील वाहतूक आणि रेल्वे वाहतुकीवर याचा परिणाम होणार आहे. या पुलाचे पाडकाम मंगळवारपासून सुरू होणार असल्याने या मार्गावरील वाहतूक एका वर्षासाठी बंद करण्यात आल्याने वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.
advertisement
मरीआई चौक ते एसटी स्टँडकडे जाणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांना मरीआई चौक, शेटे नगर, खमीतकर अपार्टमेंट, एम.एस.सी.बी. ऑफिस, निराळे वस्ती, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे एसटी स्टँडकडे जाता येणार आहे. तर मरीआई चौकाकडून रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या वाहनांना मरीआई चौक, नागोबा मंदिर, रामवाडी पोलीस चौकी, रामवाडी दवाखाना, रामवाडी ग्रीन गोडाऊन, मोदी बोगदा, जांबमुनी चौक, मोदी चौक, रेल्वे स्टेशन, सात रस्ताकडे जाता येणार आहे.
advertisement
जडवाहतुकीसाठी असेल हा मार्ग
view commentsसोलापूर शहरातील भैय्या चौकात असलेला उड्डाणपूल रेल्वे मार्गाबरोबरच मंगळवेढा, पंढरपूर आणि कोल्हापूरसह अन्य शहरांना देखील जोडणारा पूल आहे. पूल पाडण्याच्या कालावधीत मंगळवेढा रोडकडून, हैदराबाद, तुळजापूर, विजयपूर-पुणे रोडकडे जाणाऱ्या वाहनांना विजापूर रोड ते केगाव बायपासचा वापर जड वाहतुकींसाठी करावा लागणार आहे. तसेच मंगळवेढाकडून येणाऱ्या जड वाहतुकीसाठी नवीन केगाव बायपास रोडचा वापर करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. तर वाहतूक पोलिसांचे शेटे नगर पूल, नागोबा मंदिर या ठिकाणी विशेष पॉईंटचे नियोजन करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खिरडकर यांनी दिली.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
December 06, 2025 4:08 PM IST
मराठी बातम्या/सोलापूर/
सोलापूरकरांसाठी महत्त्वाची बातमी, एका वर्षासाठी बंद राहणार हा रस्ता, पर्यायी मार्ग कोणते?


