सातवीतला प्रथमेश विनवत होता, पण कंडक्टरनं ऐकलं नाही, अर्ध्या वाटेत..., सोलापूरच्या घटनेनं संताप
- Reported by:Patel Irfan Hassan
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Solapur News: माझ्या पप्पांना फोन करा, ते पैसे देतील अशी विनंती केली. पण कंडक्टरने त्याचं न एकता बस थांबवली.
सोलापूर: गावागावात पोहोचलेली लालपरी खरंतर ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी मानली जाते. याच लालपरीमुळे अनेकांचं शिक्षण झालं. परंतु, सोलापुरात एका बस वाहकाच्या कृतीने संताप व्यक्त होत आहे. एसटी बसचा पास नसल्याने सातवीच्या विद्यार्थ्याला अर्ध्या वाटेतच महामार्गावर उतरवण्यात आलं. प्रथमेश राहुल पाटील असं मंगळवेढ्यातील ब्रह्मपुरीच्या या विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेनंतर पालक आणि ग्रामस्थांनी बस वाहकावर कारवाईची मागणी केलीये.
प्रथमेश हा इयत्ता सातवीमध्ये शिक्षण घेत असून दररोज ब्रह्मपुरी येथून मंगळवेढ्याला शिक्षणासाठी बसने येजा करत असतो. शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सोलापूर मंगळवेढा एसटीने प्रथमेश प्रवास करत होता. कंडक्टर प्रथमेशकडे तिकीट काढण्यासाठी आला होता. प्रथमेशने शाळेच्या दप्तरामध्ये पास काढण्यासाठी हात घातला. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की पास घरीच राहिला आहे. त्याने कंडक्टरला, "काका पास घरी राहिला आहे. माझ्या पप्पांना फोन करा, ते पैसे देतील," अशी विनंती केली. पण कंडक्टरने त्याचं न ऐकता बस थांबवली आणि त्याला थेट चार पदरी महामार्गावरच उतरवलं.
advertisement
कंडक्टरने अचानक रस्त्यावर सोडल्यामुळे प्रथमेशला डोळ्यात अश्रू अनावर झाले. तो रस्त्यावरच रडू लागला. रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराला प्रथमेशने हात दाखवला आणि गावाकडे सोडण्यास विनंती केली. त्या व्यक्तीने त्याची मदत केली आणि गावाकडे सोडलं. प्रथमेशने घरी आल्यावर घडलेला सर्व प्रकार सांगितला.
advertisement
दरम्यान, पालकांनी तात्काळ मंगळवेढा आगाराकडे जाऊन संबंधित कंडक्टरवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली. तर घटनेची चौकशी करून संबंधितांवर नियमाप्रमाणे कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मंगळवेढा आगार व्यवस्थापक संजय भोसले यांनी दिली. या घटनेने शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवासाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे.
view commentsLocation :
Solapur,Maharashtra
First Published :
Jan 11, 2026 10:42 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
सातवीतला प्रथमेश विनवत होता, पण कंडक्टरनं ऐकलं नाही, अर्ध्या वाटेत..., सोलापूरच्या घटनेनं संताप










