विश्वासात घेतलं आणि शिक्षिकेलाच लुटलं! पोलीस पुत्राचं धक्कादायक कांड, सोलापुरात खळबळ
- Reported by:Patel Irfan Hassan
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Solapur News: वासंती यांच्या घरी स्वप्निल नेहमी ये जा करत असल्याने त्याच्यावर विश्वास ठेवला. जवळ पैसे नसल्याने त्याला सोन्याचे दागिने दिले.
सोलापूर: एका शिक्षिकेला चक्क पोलीस पुत्रानेच फसवलं आहे. तब्बल 74 लाख रुपयांच्या या फसवणूक प्रकरणाने सोलापुरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी स्वप्निल बाबुराव काळे या 34 वर्षीय पोलीस पुत्रावर गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
शिक्षिका वासंती सूर्यकांत येळे (वय 50) या विजापूर रोड येथील सदिच्छा हौसिंग सोसायटी, माशाळ वस्ती परिसरात कुटुंबीयांसह राहतात. त्यांचे पती मुंबई येथे लोहमार्ग पोलीस दलात हवालदार म्हणून कार्यरत आहेत. सन 2020 साली पोलीस बॉईज संघटनेने सोलापूर शहरात कार्यक्रम घेतले होते. या कार्यक्रमास फिर्यादी व फिर्यादीचे पती मिळून गेले होते. याच कार्यक्रमांमध्ये आरोपी स्वप्नील बाबुराव काळे यांची ओळख झाली होती.
advertisement
ओळख झाल्यानंतर स्वप्निल येळे यांच्या नेहमी घरी येऊ लागला. डिसेंबर 2020 मध्ये स्वप्निल घरी आला. तसेच येळे यांना सांगू लागला की, “वडील मयत झाले आहेत. कविता नगर पोलीस लाईन मधील घर सोडण्यास सांगितले आहे. राहण्यासाठी घर घ्यायचे असून त्यासाठी मदत करा. वडिलांचे पैसे आल्यानंतर तुम्हाला तुमचे पैसे परत देतो.” वासंती यांच्या घरी स्वप्निल नेहमी ये-जा करत असल्याने त्याच्यावर विश्वास ठेवला. जवळ पैसे नसल्याने त्याला सोन्याचे दागिने दिले.
advertisement
नावावर कार घेतल्या अन्...
सोलापूर रेल्वे स्थानकातील टूर्स अँड ट्रॅव्हल्सचं टेंडर मिळालं आहे. या व्यवसायासाठी गाड्या लागणार आहेत. त्यातून जास्त पैसा मिळवून देतो, असे आमिष दाखवून स्वप्नीलने वासंती यांच्या नावावर 3 कार घेतल्या आणि हप्तेच भरले नाहीत. तसेच त्या गाड्या खाजगी सावकाराकडे गहाण ठेवल्या.
पुढे येळे यांनी वारंवार पैशाची मागणी केली, परंतु स्वप्निल उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. अशाप्रकारे पोलीस पुत्राने एका शिक्षिकेची 74 लाख 67 हजार 654 रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शितल कुमार गायकवाड हे करत आहेत.
view commentsLocation :
Solapur,Maharashtra
First Published :
Jan 07, 2026 1:16 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
विश्वासात घेतलं आणि शिक्षिकेलाच लुटलं! पोलीस पुत्राचं धक्कादायक कांड, सोलापुरात खळबळ










