घरातून कुऱ्हाड आणली अन् थेट डोक्यात घातली, सोलापूरात शेजाऱ्यांचं तरुणासोबत भयंकर कृत्य
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Solapur: सोलापूरातील विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं दोन जणांनी एका तरुणाची निर्घृण हत्या केली आहे.
प्रीतम पंडित, प्रतिनिधी सोलापूर: सोलापूरातील विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं दोन जणांनी एका तरुणाची निर्घृण हत्या केली आहे. आरोपींनी धारदार कुऱ्हाडीने वार करत तरुणाचा जीव घेतला आहे. दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणातून ही हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून दोन्ही आरोपींचा शोध सुरू आहे. शुक्रवारी (१७ ऑक्टोबर) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
यतिराज दयानंद शंके (वय ३६, रा. गरिबी हटाव झोपडपट्टी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. मयत यतिराज शंके याची पत्नी प्रतिभा यतिराज शंके यांनी या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या तक्रारीनुसार, आकाश तुळजाराम बलरामवाले आणि नवल खरे (दोघे रा. गरिबी हटाव झोपडपट्टी) या दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
कुऱ्हाडीने केले वार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आकाश बलरामवाले आणि नवल खरे यांनी यतिराज शंकेकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. यतिराजने पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला. या क्षुल्लक कारणावरून दोघा आरोपींनी यतिराजसोबत वाद घालण्यास सुरुवात केली आणि त्याला शिवीगाळ करत हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
यतिराजची पत्नी प्रतिभा शंके यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला, परंतु आरोपींनी त्यांनाही मारहाण केली. दरम्यान, आरोपी आकाश बलरामवाले याने रागाच्या भरात आपल्या घरातून कुऱ्हाड आणली आणि कोणताही विचार न करता त्याने यतिराजच्या डोक्यावर मागील बाजूने जबर वार केला. या हल्ल्यात यतिराज गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला.
advertisement
उपचारादरम्यान मृत्यू
गंभीर जखमी झालेल्या यतिराजला त्याचा मित्र वीरेश रामपुरे आणि पत्नी प्रतिभा शंके यांनी तातडीने सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती यतिराजचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
यतिराज शंके हे पान दुकान चालवायचे, तर आरोपी आकाश आणि नवल हे मजुरीचे काम करतात. तिघांची घरे जवळजवळ असल्याने त्यांचा रोजचा संबंध होता. केवळ दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून यतिराजचा जीव घेण्यात आल्याने परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे. दोन्ही आरोपी पळून गेले असून पोलीस त्यांचा शोध घेत आगेत.
view commentsLocation :
Solapur,Maharashtra
First Published :
October 19, 2025 10:21 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
घरातून कुऱ्हाड आणली अन् थेट डोक्यात घातली, सोलापूरात शेजाऱ्यांचं तरुणासोबत भयंकर कृत्य