सह्याद्रीत घुमणार विदर्भाच्या वाघांची डरकाळी, ऑपरेशन एअरलिफ्टची तयारी जोरात
- Published by:Prachi Amale
- Reported by:Haidar Shaikh
Last Updated:
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सध्या 3 नर वाघ आहेत मात्र या भागात वाघांची संख्या वाढवण्यासाठी वाघिणींची गरज आहे.
चंद्रपूर : वाघांची संख्या वाढावी यासाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडून चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पाकडे 8 वाघीणींची मागणी करण्यात आली आहे. याबाबतच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली असून ताडोबा प्रशासनाने ज्या वाघिणी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पाठवायच्या आहे त्यांना चिन्हीत करण्याचं काम सुरू केलं आहे. विशेष म्हणजे ताडोबा ते सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हे अंतर जवळजवळ 1000 किलोमीटर असल्यामुळे या वाघिनींना हेलिकॉप्टरच्या मदतीने एयरलिफ्ट करण्याचा सध्या विचार सुरू आहे.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नेण्याबाबत विचार केला जात आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सध्या 3 नर वाघ आहेत मात्र या भागात वाघांची संख्या वाढवण्यासाठी वाघिणींची गरज आहे. तर दुसरीकडे ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वाघांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. अधिवास अपुरा पडत असल्यामुळे अनेक वेळा वाघांच्या आपसातील झुंजी मध्ये त्यांचा जीव जातो. त्यामुळे गेल्या काही वर्षात ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून अतिरिक्त ठरलेल्या वाघांना दुसऱ्या व्याघ्र प्रकल्पात स्थलांतरित करण्याचा प्रयोग सुरू करण्यात आलेला आहे.
advertisement
याआधी देखील ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील दोन वाघिणी या ओरिसा राज्यातील सिमलीपाल व्याघ्र प्रकल्पात तर तीन वाघिणी या गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव व्याघ्र प्रकल्पात स्थलांतरित करण्यात आलेल्या आहेत आणि याचे सकारात्मक परिणाम देखील दिसून आले आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव व्याघ्र प्रकल्प
सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव व्याघ्र प्रकल्प आहे. सातारा जिल्ह्यातील कोयना अभयारण्य, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात विस्तारलेलं चांदोली राष्ट्रीय उद्यान मिळून हा व्याघ्र प्रकल्प निर्माण झाला आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढावी यासाठी राज्यातील इतर ठिकाणांहून काही वाघ स्थलांतरित केले जावेत, यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे मागणी केली होती. या मागणीला पर्यावरण, वन व जलवायू परिवर्तन मंत्रालयाने मान्यता दिली आहे.
advertisement
जैवविविधतेला मिळेल चालना
ताडोबा आणि पेंच हे महाराष्ट्रातील सर्वांत मोठे व्याघ्र पकल्प आहे. याठिकाणी वाघांचा अधिवास मोठा आणि संख्या जास्त आहे. येथून स्थलांतरित होणारे वाघ सह्याद्रीत नवीन जीवनक्षेत्र निर्माण करतील. यामुळे कोल्हापूर आणि रत्नागिरीसह पश्चिम महाराष्ट्रातील जैवविविधतेला चालना मिळेल. सह्याद्रीत वाघ वाढले तर संपूर्ण सह्याद्री घाटाला पर्यावरणीय व पर्यटनदृष्ट्या नवे महत्त्व प्राप्त होईल, अशी प्रतिक्रिया व्याघ्र अभ्यासकांनी दिली आहे.
view commentsLocation :
Chandrapur,Chandrapur,Maharashtra
First Published :
October 17, 2025 4:48 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सह्याद्रीत घुमणार विदर्भाच्या वाघांची डरकाळी, ऑपरेशन एअरलिफ्टची तयारी जोरात