डोंबिवलीतील 'आदर्श' सोसायटी; कचऱ्यापासून सेंद्रीय खत करतात तयार अन् जपतात स्वत:चं आयुष्य
- Published by:News18 Lokmat
Last Updated:
डोंबिवलीतल्या 'या' सोसायटीनं आपल्या कृतीनं सर्वांसमोर आदर्श घालून दिला आहे.
डोंबिवली 21 ऑगस्ट : कचऱ्याची विल्हेवाट करणे ही सर्वच शहरांमधली मुख्य समस्या आहे. ही समस्या सोडवण्यासाठी सरकारनं कचऱ्याचे वर्गीकरण करुन खतनिर्मिती करा असं धोरण आणलं. या सरकारी धोरणारा केराची टोपली दाखवण्याचं काम अनेक ठिकाणी केले जाते. त्याचवेळी डोंबिवलीजवळच्या नेतावलीमधील रिजेन्सी सोसायटीनं जिद्दीनं हा प्रकल्प यशस्वी केलाय.
या सोसासटीनं गेल्या 5 वर्षांमध्ये 50 टन कचऱ्यावर प्रक्रिया करुन खत तयार केलंय. कचऱ्यापासून तयार झालेले सेंद्रीय खत ते पुणे जिल्ह्यातल्या जुन्नरमधल्या शेतकऱ्यांना देतात. त्याबदल्यात ते शेतकरी सोसायटीतील नागरिकांना ताजी भाजी आणून देतात. संपूर्ण डोंबिवली परिसरात हा प्रकल्प सध्या चर्चेचा विषय बनलाय.
advertisement
कसा चालतो प्रकल्प?
सोसायटीतील सदस्यांकडून कचरा घेताना वर्गीकरण केले जाते. यामध्ये ओला कचरा सुका कचरा आणि मेडिकल वेस्ट असे तीन भाग केले आहेत. यातील ओला कचरा सोसायटीच्या बाजूला असलेल्या प्रोसेसिंग युनिटमध्ये नेला जातो. हा कचरा युनिटमध्ये आल्यानंतर पुन्हा त्याची छाननी केली जाते. त्यानंतर तो प्रोसेसिंग युनिटमध्ये टाकला जातो. त्यामध्ये लाकडाचा भुसा आणि आधीचे खत टाकून हा कचरा प्रोसेस केला जातो. त्यानंतर पुढील पाच दिवस त्याला सतत मिक्स करावे लागते. 14 दिवसात हे संपूर्ण खत तयार होते.
advertisement
या सोसायटीने वेस्ट वॉटर प्रकल्प देखील राबविला आहे. या सोसायटीत 250 घरे आहेत. या साऱ्यांचे स्वयंपाकघरातील सांडपाणी आणि बाथरूम मधील सांडपाणी थेट एका टॅंकमध्ये जमा होते. त्यानंतर त्यावर प्रक्रिया केली जाते आणि ते पाणी पुन्हा टॉयलेट मध्ये वापरले जाते. या सोसायटीने एक पर्यावरण रक्षणाचा वसा उचलला असून सोसायटीतील सदस्य स्वतः लक्ष देऊन हे प्रकल्प सुरू राहण्यासाठी धडपडत आहेत.
advertisement
हा प्रकल्प पाहण्यासाठी वेगवेगळ्या शाळेचे विद्यार्थी देखील याला भेट देत आहेत. शनिवारी सर्वोदय विद्यालय आणि रवींद्रनाथ टागोर इंग्लिश स्कूलचे सुमारे ५० विद्यार्थ्यांनी मलंग रोड वरील पार्क रीजन्सी येथील घनकचरा प्रकल्पाला भेट दिली. ओल्या कचऱ्यावर प्रकिया कशाप्रकारे होते याची माहिती पृथ्वी इको सोल्युशन्सचे श्रीकांत जोशी यांनी सर्व मुलांना समजावून सांगितली. यावेळी त्यांनी प्रात्यक्षिक करून दाखवली तसेच वर्गीकरणाचे महत्व समजावून सांगितले. त्यांना केवळ वर्गीकरणाचे महत्त्व समजले तरी असे प्रकल्प राबविण्यास मदत होईल अशी आशा पर्यावरण प्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.
advertisement
Location :
Kalyan-Dombivli,Thane,Maharashtra
First Published :
August 21, 2023 9:26 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
डोंबिवलीतील 'आदर्श' सोसायटी; कचऱ्यापासून सेंद्रीय खत करतात तयार अन् जपतात स्वत:चं आयुष्य

