Mhada Lottery: स्वस्तात खरेदी करा दुकान, म्हाडाच्या 71 अनिवासी गाळ्यांचा ई-लिलाव, संपूर्ण माहिती एका क्लिकवर
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
स्वस्तात गाळा खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाकडून ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील अनिवासी गाळ्यांच्या विक्रीसाठी ई लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे.
मुंबई : स्वस्तात गाळा खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाकडून ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील अनिवासी गाळ्यांच्या विक्रीसाठी ई लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे. विरार बोळींज आणि चितळसर मानपाडा येथे गृहनिर्माण प्रकल्प परिसरात एकूण 71 अनिवासी गाळे आहेत. त्यांची विक्री होणार असून, ई-लिलाव प्रक्रियाही सुरू झाली आहे. गो लाईव्ह कार्यक्रमांतर्गत म्हाडाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखडे यांच्या हस्ते आज प्रारंभ करण्यात आला.
सदर लिलावात विरार बोळींज येथील 44 अनिवासी गाळे आणि चितळसर मानपाडा येथील 27 अनिवासी गाळे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजेपासून संगणकीय प्रणालीमध्ये पात्र ठरलेल्या अर्जदारांसाठी ऑनलाइन बोली स्वरूपातील ई-लिलाव www.eauction.mhada.gov.in या संकेतस्थळावर होणार आहे. 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.00 वाजता https://eauction.mhada.gov.in व https://mhada.gov.in या दोन्ही संकेतस्थळांवर ई-लिलावाचा एकत्रित निकाल जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी दिली.
advertisement
कोकण मंडळातील अनिवासी गाळ्यांच्या ई-लिलाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठी https://eauction.mhada.gov.in संकेतस्थळावर नोंदणी करणे, ऑनलाईन अर्ज करणे, कागदपत्रे अपलोड करणे यासाठी 11 सप्टेंबर रोजी दुपारी 12.00 वाजेपासून ते 26 सप्टेंबर रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. 26 सप्टेंबर ते 03 ऑक्टोबर या कालावधीत अर्जदारांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. अनामत रक्कम 08 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.00 वाजेपासून 10 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत अर्जदारांना भरता येणार आहे.
advertisement
ई-लिलाव प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी अर्जदाराचे वय ई-लिलावासाठी अर्ज करतेवेळी 18 वर्षांपेक्षा जास्त असावे, अर्जदाराने महाराष्ट्र राज्यातील सन 2018 नंतर काढलेले अधिवास प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असून ऑफसेट किमतीनुसार विहित अनामत रक्कम भरणे गरजेचे आहे.
सदर लिलावाबाबत विस्तृत पात्रता निकष, प्रत्येक गाळ्याचे विवरण, सामाजिक आरक्षण व अर्ज करण्याची कार्यपद्धती, सविस्तर अटी व शर्ती, ऑनलाईन अर्ज सूचना, माहितीपुस्तिका याबाबतची माहिती https://eauction.mhada.gov.in व https://mhada.gov.in या संकेतस्थळावरील Lottery>Eauction>eauction या पोर्टलवर उपलब्ध आहे. अर्जदाराने संकेतस्थळावरील व माहिती पुस्तिकेतील सविस्तर सर्व अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचूनच अर्ज सादर करावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
September 11, 2025 10:30 PM IST
मराठी बातम्या/ठाणे/
Mhada Lottery: स्वस्तात खरेदी करा दुकान, म्हाडाच्या 71 अनिवासी गाळ्यांचा ई-लिलाव, संपूर्ण माहिती एका क्लिकवर