जीवलग मित्रच झाला जीवाचा दुश्मन, भिवंडीत जुन्या वादातून तरुणाची अमानुष हत्या
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Bhiwandi: ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. इथं एका तरुणाने आपल्या काही साथीदारांशी मिळून आपल्याच मित्राची हत्या केली आहे.
नरेंद्र पाटील, प्रतिनिधी भिवंडी: ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. इथं एका तरुणाने आपल्या काही साथीदारांशी मिळून आपल्याच मित्राची हत्या केली आहे. जुन्या वादातून तरुणाने हा खूनी बदला घेतला आहे. या प्रकरणी भिवंडीतील शांतीनगर पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
भिवंडीतील शांतीनगर परिसरात ही घटना घडली असून जिशान अन्सारी असं हत्या झालेल्या २५ वर्षीय युवकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिशान अन्सारी आणि आरोपी असलेले हसन मेहबुब शेख (वय २२), मकबुल मेहबुब शेख (वय ३०), हुसेन मेहबुब शेख (वय २८) हे तिघे भाऊ एकाच गोदामात हमालीचे काम करत होते. एकाच परिसरात राहत होते. त्यांच्यात कामावरून काही दिवसांपूर्वी किरकोळ वाद झाला होता.
advertisement
या वादातून राग मनात धरून हसन आणि त्याच्या दोन भावांनी, तसेच सुलताना मेहबुब शेख आणि आसमा वाजीद या पाच जणांनी जिशानच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करत मारहाण केली. त्याचवेळी जिशान दुचाकीवरून घरी आला. तो दुचाकीवरून उतरत असताना हसन याने त्याला लाथ मारून खाली पाडले. ही लाथ वर्मी लागल्याने जिशानचा जागीच मृत्यू झाला.
advertisement
याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलिसांनी पाचही आरोपींना ताब्यात घेतले आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. केवळ लाथ मारल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
Location :
Bhiwandi Nizampur,Thane,Maharashtra
First Published :
October 05, 2025 1:38 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
जीवलग मित्रच झाला जीवाचा दुश्मन, भिवंडीत जुन्या वादातून तरुणाची अमानुष हत्या