Tomato Rate: टोमॅटो कधी गोड तर कधी आंबट! दर कमी झाल्याने ग्राहक आनंदात तर शेतकरी चिंतेत
- Published by:Vrushali Kedar
- local18
Last Updated:
Tomato Rate: सततच्या पावसामुळे टोमॅटो पिकाला मोठा फटका बसला आहे. शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत.
ठाणे : सध्या राज्यात सर्वदूर पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी पावसाची संततधार सुरू आहे. सततच्या पावसामुळे टोमॅटो पिकाला मोठा फटका बसला आहे. परिणामी टोमॅटोच्या दरात सतत चढउतार होताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे टोमॅटोची आवक कमी झाली आणि टोमॅटोचे भाव गगनाला भिडले होते. मात्र, आता अचानक आवक वाढल्याने टोमॅटोचे दर पुन्हा कोसळले आहेत, टोमॅटो 100 रुपयांवरून पुन्हा 20 ते 50 रुपये किलोवर आले आहेत.
मागणी आणि पुरवठ्या असमतोलामुळे टोमॅटोच्या दरात चढ-उतार होत आहेत. हवामानातील बदल, पावसाचा फटका आणि नाशवंत पिक असल्याने अनेकदा शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागतो. गेल्या काही दिवसात नारायणगाव व इतर भागांतून मोठ्या प्रमाणात टोमॅटोची आवक झाल्याने टोमॅटोचे दर कोसळले. पावसाचा फटका बसला असला तरी आवक भरभरून होत असल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
advertisement
ठाणे मार्केटमधील व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, टोमॅटो हे नाशवंत पीक असल्याने भाव काहीही असला तरी शेतकऱ्यांना माल बाजारात आणणे भागच असते. सध्या बाजारात कमी दर्जाचे टोमॅटो 20 ते 30 रुपये किलो तर चांगल्या दर्जाचे टोमॅटो 40 ते 50 रुपये किलो या दराने उपलब्ध आहेत. होलसेल बाजारात दर्जेदार टोमॅटोचा दर प्रतिजाळी 1000 रुपये असून त्यात 28 किलो टोमॅटो मिळतात. तर कमी दर्जाच्या टोमॅटोची जाळी 500 रुपयांना मिळत आहे.
advertisement
टोमॅटोचे दर कमी झाल्याने ग्राहक सुखावला असला तरी शेतकऱ्यांना मात्र तोटा सहन करावा लागत आहे. टोमॅटो लागवडीपासून ते मजुरी, औषधं, तोडणी आणि वाहतुकीचा खर्च वाढला आहे. शिवाय, दरातील अनिश्चिततेमुळे शेतकरी अडचणीत सापडतात. अनेकदा त्यांना मोठा आर्थिक फटका देखील बसतो, असं कृषी तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
September 02, 2025 10:03 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Tomato Rate: टोमॅटो कधी गोड तर कधी आंबट! दर कमी झाल्याने ग्राहक आनंदात तर शेतकरी चिंतेत