Uddhav Thackeray Raj Thackeray : अखेर तो ऐतिहासिक क्षण आला! अवघा महाराष्ट्र भावुक, उद्धव-राज भेटीचा पहिला Video
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Uddhav Thackeray Raj Thackeray : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू जवळपास 19 वर्षाच्या कालावधीनंतर राजकीय मंचावर एकत्र आले आहेत. सरकारने त्रिभाषेचा जीआर रद्द केल्यानंतर आज मराठी विजय मेळावा साजरा केला जात आहे.
मुंबई: ज्या क्षणांची प्रतीक्षा महाराष्ट्राला होती अखेर तो क्षण आला. जवळपास 20 वर्ष राजकीय दृष्ट्या दुरावलेले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आले. दोन्ही नेत्यांच्या भेटीचा ऐतिहासिक क्षण हजारो लोकांनी प्रत्यक्षात डोळ्यात साठवला. त्रिभाषा सक्तीचा आदेश राज्य सरकारने रद्द झाल्यानंतर आज ठाकरे बंधूच्या पुढाकारातून विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. वरळीतील NSCI डोममध्ये हा विजयी मेळावा होत आहे. या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू जवळपास 19 वर्षाच्या कालावधीनंतर राजकीय मंचावर एकत्र आले आहेत. सरकारने त्रिभाषेचा जीआर रद्द केल्यानंतर आज मराठी विजय मेळावा साजरा केला जात आहे.
सभेच्या विचारमंचावर आल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची गळाभेट घेतली. या ऐतिहासिक क्षणावर सभागृहात टाळ्या, शिट्या, घोषणा निनादू लागल्या. 19 वर्षानंतर हे दोन्ही नेते एकत्र आल्याचा क्षण पाहून अवघा महाराष्ट्र भावुक झाला.
राज्य सरकारने त्रिभाषा सक्तीचा जीआर मागे घेतल्यानंतर, हा मेळावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संयुक्त पुढाकारातून आयोजित करण्यात आला. या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासह विशेष म्हणजे शेकाप, माकप, भाकप, भाकप माले या डाव्या पक्षांच्या नेत्यांनी देखील हजेरी लावली होती. या पार्श्वभूमीवर 'मराठी विजय मेळावा' हे केवळ एक राजकीय कार्यक्रम नसून, मराठी अस्मितेचा आणि एकतेचा सशक्त संदेश देणारा क्षण ठरला. या सोहळ्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो कार्यकर्ते आणि मराठीप्रेमी जमले होते.
advertisement
या मेळाव्याच्या निमित्ताने केवळ त्रिभाषा सक्तीचा विरोध नव्हे, तर मराठी भाषेच्या सन्मानासाठी एकत्र येण्याचा नवा अध्याय सुरू झाला आहे, अशी भावना उपस्थितांमध्ये उमटली. उद्धव आणि राज ठाकरे यांचं व्यासपीठावरचं एकत्र येणं हे भविष्यातील राजकीय समीकरणांच्या दृष्टिकोनातूनही महत्वाचं मानलं जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 05, 2025 12:11 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Uddhav Thackeray Raj Thackeray : अखेर तो ऐतिहासिक क्षण आला! अवघा महाराष्ट्र भावुक, उद्धव-राज भेटीचा पहिला Video