Maharashtra Politics: "आता त्यांचा पापाचा घडा भरला"; मुख्यमंत्री शिंदे आणि उद्धव ठाकरेंमध्ये निवडणुकीच्या तोंडावर धुमश्चक्री
- Published by:Rohit Shinde
Last Updated:
"आता त्यांचा पापाचा घडा भरला"; मुख्यमंत्री शिंदे आणि उद्धव ठाकरेंमध्ये निवडणुकीच्या तोंडावर धुमश्चक्री
नागपूर: मुख्यमंत्री शिंदेंनी बंड करत सरकार स्थापन केलं या घटनेला आता अडीच वर्षे झाली आहेत. तेव्हापासून राज्यात मुख्यमंत्री शिंदे विरूद्ध उद्धव ठाकरे हा राजकीय सामना पाहायला मिळतोय. राजकीय सभेचं मैदान असो की विकासकामांची चर्चा हे द्वंद्व सुरू आहे. आज संभाजीनगरच्या शिवसंकल्प मेळाव्यातून उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर पर्यायाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जहरी टीका केली. सत्ताधारी आणि मुख्यमंत्र्यांचा पापाचा घडा भरला आहे, अशी टीका ठाकरेंनी केली. त्याचबरोबर सरकारी योजनांचं अपयश, जनतेला, शेतकऱ्यांना होणार मनस्ताप या विषयांवर ठाकरेंनी भाष्य केलं. काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जात त्यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली. शेतकऱ्यांनी संवाद साधला. आता ठाकरेंवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जोरदार पलटवार केला आहे.
जनतेची साथ धनुष्यबाणाला -मुख्यमंत्री "ज्यांनी बाळासाहेबांचा विचार सोडला त्यांना जनता आगामी निवडणुकीत धडा शिकवणार आहे. वर्षभरापूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत लोकांना ठाकरेंना साफ नाकारलं, त्यांचा पक्ष सातव्या क्रमांकावर राहिला. लोकांची खरी साथ ही आम्हाला मिळतं आहे. आम्ही बाळासाहेबांचा विचार पुढे नेत आहोत. शिवसेनेचा मुळ मतदार आजही धनुष्यबाणासोबत आहे," असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
advertisement
"...त्यांचा पापाचा घडा भरला" "खऱ्या अर्थाने पापाचा घडा हा उद्धव ठाकरेंचा भरला आहे. याची प्रचिती महाविकास आघाडीच्या नेत्यांना विधानसभेत येईल" असं टीकास्त्र शिंदेंनी डागलं. "कधी घराच्या गेटच्या बाहेर न जाणारे आता शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत" ही बाब निश्चितच आशादायी आहे, असा टोला मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंना लगावला आहे. जनता महायुतीच्या पाठीशी येणाऱ्या काळात भक्कमपणे उभी राहणार आहे.
advertisement
महायुतीच्या लोकोपयोगी योजना- यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी महायुती सरकारने राबवलेल्या विविध लोकोपयोगी योजनांचा पाढा वाचला. "सर्वाधिक चर्चेत राहिलेली लाडकी बहिण योजना महिलांसाठी उपयुक्त ठरत आहे. अल्प उत्पन्न गटातील कुटुंबाना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत. सरकारने शेतकऱ्यांना वीज बिल माफीचं दिलेले आश्वासन पूर्ण केलं जाणार आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना इन्सेंटीव्ह दिलं जाईल" असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
advertisement
एकंदरीतच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान मुख्यमंत्री विरूद्ध उद्धव ठाकरे असा थेट सामना पाहायला मिळणार आहे, हे यावरून स्पष्ट झालं आहे. सत्ताधाऱ्यांवर ठाकरे शेवटपर्यंत हल्ला चढवत राहणार ही बाब स्पष्ट आहे. आता राजकीय सामना नेमका कुठे थांबतो आणि राज्यातील जनता विधानसभेला नेमकी कुणाला साथ देते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 07, 2024 5:17 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Politics: "आता त्यांचा पापाचा घडा भरला"; मुख्यमंत्री शिंदे आणि उद्धव ठाकरेंमध्ये निवडणुकीच्या तोंडावर धुमश्चक्री


